Breaking newsHead linesMaharashtraPachhim MaharashtraPune

पुणे पाण्यात! मुंबई, ठाणेसह राज्यातही पावसाने हाहाकार!

पुणे (वैभवी जोशी/महेंद्र हिवाळे) – राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसह ठाणे व महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना मान्सूनच्या पावसाने व्यापून टाकले असून, काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पुण्यामध्ये बुधवार रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सखल रहिवासी भागांतील घरात पाणी शिरले असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून, जिल्हा प्रशासनाकडून कंपन्यांनाही सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आपत्ती निवारण यंत्रणा रस्त्यावर उतरवली आहे. अनेक रहिवासी भागांत पाणी साचल्याने नागरिक घरांत अडकून पडले होते. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले आहे.

पुणे शहरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला, तर येत्या काही तासांमध्ये पुणे शहर परिसरातील, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मुठा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पुलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पुलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग कमी करण्याची विनंती केली. मात्र मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागेल, असे उत्तर जलसंपदा विभागाने महापालिकेला दिले आहे. त्यामुळे हा विसर्ग वाढवल्यानंतर नदी परिसरातील परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पाणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही भागात पालिका प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सिंहगड परिसरातील निंबजनगरमध्ये महिला, लहान मुले, नागरिक अडकले आहेत. एकतानगर परिसरात बोटीद्वारे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

सोसायट्यांत शिरलेले पाणी.

पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी आपण परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे म्हटले असून, सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. गरज पडताच नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. दुसरीकडे, हवामान विभागाने पुढील काही तासांमध्ये पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यात जोरदार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यात तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला असून, डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथील ही घटना आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसर्‍या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे तिघेजण अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. रात्री गाडी बंद करून पाऊस जोरात आला, म्हणून तिथे आवराआवरी करायला परत गेले होते. तिथे गुडघाभर पाणी साचले होते. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील विसर्ग सुरू केला आहे. काल रात्री भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत पाणी शिरले आहे. संगम पूल पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे. कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्यात आलेला आहे.


सर्वांनी फिल्डवर उतरा, मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना

दरम्यान, सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकार्‍यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी मी बोललो आहे. तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वैगरे रवाना केल्या आहेत. लष्करदेखील आता पुण्यात पोहोचले आहे. तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. पुण्याबरोबरच कोल्हापुरात पावसाने थैमान घातले असून, कोल्हापुरातही पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी धोकापातळीच्या जवळ पोहोचली आहे.


पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या, पूरस्थिती निर्माण झाल्याच्या तर भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अशामध्ये पुण्यातील लवासा हिल स्टेशनवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दोन बंगल्यावर दरड कोसळली. या घटनेमध्ये 2 ते 4 जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती जिल्हा ​प्रशासनाला देण्यात आली आहे. पालघरसह ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शाळांना सुटी दिली आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला राज्यातील पावसाचा आढावा घेतला आहे. त्यांनी पूर सदृश्य भागात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी केली चर्चा केली आहे. सर्व लोकप्रतिनिधींना परिसरातील नागरिकांना मदत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!