Breaking newsHead linesMaharashtraPachhim MaharashtraPune

वर्षाविहारासाठी आलेले अख्खे कुटुंब वाहून गेले; लहान मुलांसह पाच जण ठार!

– लोणावळ्यातील भुशी धरण परिसरातील दुर्देवी घटना

पुणे (वैष्णवी मांडेकर) – लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात वर्षाविहारासाठी आलेले एक संपूर्ण कुटुंब वाहून गेल्याची धक्कादायक व थरारक घटना काल, रविवारी घडली आहे. ३६ वर्षीय महिला आणि १३ व ८ वर्षे वयाच्या दोन मुलींचा मृत्यू झाला असून, धरणाजवळील नदीतून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय, पाण्याच्या जोरदार प्रवाहात कुटुंबासह वाहून गेलेल्या दोन मुलांचा शोध सुरू आहे. पर्यटकांची पंढरी समजल्या जाणार्‍या लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असून, लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. धरणाच्या पाठीमागे असलेले धबधबे पाहण्यासाठी दुःखाचा डोंगर कोसळेले अन्सारी कुटुंब गेले होते, याच परिसरातून या एकाच कुटुंबातील सात जण वाहून गेले होते. त्यापैकी पाचजण मृत्युमुखी पडले आहेत. पोलिस, वन्यजीव रक्षक आणि ग्रामस्थांच्यावतीने शोधमोहीम आजही सुरू होती.

या दुर्देवी घटनेचा भयानक व्हिडिओ समोर आला असून, वाहत्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी हे अन्सारी कुटुंब प्रवाहात उतरल्याचे दिसून येत आहे. नंतर अचानक प्रवाह वाढल्याने संपूर्ण कुटुंब पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वेढलेले दिसत आहे. कोणी दोरी फेकून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, तर कोणी सर्वांना एकत्र बांधून राहण्याचा सल्ला देत आहे. घटनास्थळी आरडाओरडा सुरू आहे. काही वेळातच ते सर्व जोरदार प्रवाहाने वाहून जातात. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात अन्सारी कुटुंबातील महिला, लहान मुले हेदेखील वाहून जात असताना या व्हिडिओत दिसून येत आहे. यापैकी दोघांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर येता आल्याने त्यांचे प्राण बचावले. परंतु चार लहान मुलांसह एक महिला दुर्देवाने वाहून गेली. तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले. रविवारी थांबविलेले बचावकार्य सोमवारी सकाळी पुन्हा सुरु झाले, मात्र दोघे जण अद्यापही बेपत्ता आहेत. लग्नानिमित्त आग्रा येथून पुण्यात आलेल्या अन्सारी कुटुंबावर दुःखाचा हा डोंगर कोसळलेला आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दोघाजणांचे मृतदेह सापडले, ते बाहेर काढण्यात आले. रात्री अंधार पडल्यानंतर शोधकार्य थांबविण्यात आले व आज सोमवारी पुन्हा शोधकार्य सुरू झाले होते. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या अपघातानंतर ३६ वर्षीय महिला, एक १३ वर्षीय आणि एका ८ वर्षीय मुलीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय, अपघातानंतर एक ९ वर्षांचा आणि एका चार वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे.

बुडालेल्या व्यक्तींची नावे :

साहिस्ता लियाकत अन्सारी (वय 36 वर्ष), अमिमा आदिल अन्सारी (वय 13 वर्ष), उमेश आदिल अन्सारी (वय 8 वर्ष), अदनान सबाहत अन्सारी (वय 4 वर्ष) आणि मारिया अकील सय्यद (वय 9 वर्ष) अशी आहेत. यापैकी साहिस्ता, अमिमा आणि उमेश यांचा मृत्यू झाला असून, त्याचे मृतदेह सापडले आहेत. तर, बुडालेल्या इतर दोघांचा शोध सुरु आहे.
——–
लग्न सोहळ्यासाठी अन्सारी कुटुंब आणि नातेवाईक एकत्र आले होते. २७ तारखेला लग्न झाले. गुलजार अन्सारी यांचे तारिक अन्सारीसोबत लग्न झाले. त्यानंतर दोन दिवसांपासून सगळ्यांचे पावसाळी पिकनिकचे प्लॅनिंग सुरु होते. रविवारी दि. ३० तारखेच्या सकाळी सर्वजण भुशी डॅम परिसरात आले. ते एकूण १७ जण होते, टेम्पो ट्रॅव्हलरने सगळे जण आले होते, अशी माहिती त्यांच्या एका नातेवाईकाने दिली. या दुर्देवी घटनेनंतर पावसाळ्यात पर्यटनस्थळी काळजी घेण्याचे आवाहन पोलिस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. पर्यटकांनी पर्यावरणाचा आनंद घ्यावा, मात्र स्टंटबाजी करण्याचे टाळले पाहिजे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!