चिखली (महेंद्र हिवाळे) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील दरमहा मिळणार्या दीड हजार रूपयांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याकरिता महिलांची तहसील व तलाठी कार्यालयात एकच गर्दी उसळली होती. या योजनेकरिता पात्रताधारक महिलांना दि.१ ते १५ जुलैपर्यंत अर्ज करायचे असल्याने पहिलीच्याच दिवशी अगदी रेटारेटी होईपर्यंत महिलांची गर्दी उसळली होती. दरम्यान, या योजनेत अतिशय जाचक अटी व शर्ती घातल्याने महिलांनी या सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ पात्र लाभार्थी महिलेला महिन्याला दीड हजार रूपये म्हणजे वर्षाला 18 हजार रूपये हे राज्य सरकार थेट हस्तांतरित करणार आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दरमहा दीड हजार रूपये देणारी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून, २९ जूनला याबाबतचा शासन आदेश जारी झाला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील वय वर्षे २१ ते ६० वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहे. याकरिता पात्रताधारक महिलांना दि.०१ जुलै २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. या योजनेचे स्वरुप पाहिले असता, पात्र महिलेला तिच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने दर महिन्याला १५०० रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. तसेच महिला यापूर्वीपासून केंद्राच्या तसेच राज्य शासनांच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनाद्वारे १५०० रूपयांपेक्षा कमी आर्थिक लाभ घेत असल्यास तर फरकाची रक्कम पात्र महिलांना देण्यात येणार आहे. या योजनांच्या माध्यमातून लाभ घेण्याकरिता लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विवाहीत, परितत्तäया, विधवा, निराधारीत महिला या योजनेचा लाभ घेवू शकतील. तसेच लाभार्थी महिलांचे किमान वय हे २१ वर्षे तर कमाल वय हे ६० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, रहिवासी (अधिवास) प्रमाणपत्र, राज्यातील जन्म दाखला, वार्षिक फक्त अडिच लाख रूपये उत्पन्न असल्याचा कुटुंब प्रमुखाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला. पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते, रेशकार्ड, योजनांच्या अटी व शर्तींचे पालन करणेबाबत हमीपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक १ जुलै २०२४ ते दि.१५ जुलै २०२४ पर्यंत महिलांनी त्यांचे अर्ज पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतु सुविधा केंद्राद्वारे सादर करायचे आहेत तर ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाहीत, अशांनी अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत, सेतु सुविधा केंद्र येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, असे शासनाने कळवले होते. परंतु, अद्यापही ग्रामपंचायत पातळीवर ही सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील महिलांनी तहसील व तलाठी कार्यालयांत अर्ज घेण्यासाठी व भरण्यासाठी एकच गर्दी केली होती.
———
राज्य सरकारच्या जाचक अटींमुळे योजना ठरणार वांझोटी!
या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने खूपच जाचक अटी घातलेल्या आहेत. त्यामध्ये कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडिच लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे. घरात कुणी सरकारी नोकरीत नसावा, किंवा कुणी सेवानिवृत्ती वेतनधारक नसावा, संबंधित महिलेने शासनाच्या इतर योजनेचा दीड हजार रूपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेला असू नये, घरातील कुणीही व्यक्ती राज्य किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही सेवेत असू नये, जर कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असेल तर या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही, घरी ट्रॅक्टरसोडून इतर कुठलेही चारचाकी वाहन असेल तरही लाभ मिळणार नाही. अनेक महिलांकडे जन्म दाखला नसून, गरिबात गरीब महिलेच्या कुटुंबाचेही वार्षिक उत्पन्न आजकाल तीन लाखाच्यापुढे आहे. त्यामुळे इतक्या किचकट अटी व शर्तीमुळे अनेक गोरगरीब, विधवा, परित्यत्तäया महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे. शिवाय, शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत ही १५ जुलैपर्यंतच ठेवली आहे. त्यामुळे महिलांची मोठी गोची झाली असून, कागदपत्रे कशी उपलब्ध करावीत, या विवंचनेत महिला आहेत.
———
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी शंभर रूपयांच्या स्टॅम्पऐवजी चालणार स्वयंघोषणा पत्र!