BULDHANAChikhaliHead linesVidharbhaWomen's World

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी शंभर रूपयांच्या स्टॅम्पऐवजी चालणार स्वयंघोषणा पत्र!

– तहसील कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही!

चिखली (महेंद्र हिवाळे) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेली ‘लाडकी बहीण’ योजना महिलांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरत असून, या योजनेसाठी अर्ज दाखल करताना महिलांची प्रचंड दमछाक होत आहे. दरम्यान, लाभार्थी महिलांना नावात बदल असेल तर शंभर रूपयांचा स्टॅम्प पेपर वरून प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागत होते. त्यामुळे बॉण्ड पेपरचा तुटवडा निर्माण होऊन काळाबाजारही सुरू झाला होता. याबाबत शेतकरी नेते विनायक सरनाईक व ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने ही बाब महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार, महसूल प्रशासनाने शंभर रूपयांच्या बॉण्ड पेपरची गरज नसून, महिलांनी स्वयंघोषणापत्र सादर करावे, असे जाहीर केले आहे. तशी सूचनाही चिखली तहसील कार्यालयात लावण्यात आली आहे.
तहसील कार्यालयात लावलेली सूचना.

‘लाडकी माझी बहीण’ ही योजना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सरकारने ही योजना तडकाफडकी जाहीर केली. योजनेच्या अतिशय किचकट अशा अटी व शर्ती पाहाता, बहुतांश महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. तसेच मोजक्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तरीदेखील मोठ्या संख्येने महिला या योजनेसाठी अर्ज दाखल करत आहेत. या योजनेमध्ये लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांची गर्दी होत असून, त्यांना दलाल व एजंटाचाही विळखा पडला आहे. महिलांना कागदपत्रे काढण्यासाठी जास्तीचा खर्च येत होता. ज्या महिलेच्या जन्मदाखला, शाळा सोडण्याचा दाखला (टीसी) व आधार कार्डमधील नावांमध्ये बदल असेल, त्यांना शंभर रूपयांच्या बॉण्डवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागत होते. त्यामुळे शंभर रूपयांच्या बॉण्ड पेपरचा तुटवडा निर्माण झाला होता. तसेच ते अव्वाच्या सव्वादराने विकले जात होते. तसेच, तहसील कार्यालयात मोठी गर्दीही उसळली होती. ही बाब शेतकरी नेते विनायक सरनाईक व ब्रेकिंग महाराष्ट्रचे चिखली तालुका विशेष प्रतिनिधी महेंद्र हिवाळे यांनी तहसीलदारांच्या निर्दशनास आणून दिली होती. त्यानुसार, महसूल प्रशासनाने संबंधित महिलांनी वय, अधिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र हे अर्ज भरतांना दोन साक्षीदारांच्या सह्या घेऊन स्वयंघोषणापत्र सादर करावेत. त्यासाठी शंभर रूपयांच्या बॉण्ड पेपरची गरज नाही. स्वयंघोषणापत्राचा नमुना सेतु सुविधा केंद्र चालकांकडे उपलब्ध आहे, त्यासाठी तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही, असे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महा ई-सेवा सेतु सुविधा केंद्र चालकांनी या योजनेकरिता नाव बदलासाठी स्वयंघोषणापत्राचा वापर करावा, अशी सूचना तहसीलदारांनीदेखील संबंधितांना दिली आहे. त्यामुळे महिलांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रती महिना देण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर आता 1 जुलैपासून हे अर्ज भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली आहे. यासाठी महिलांनी तलाठी कार्यालये व आपले सरकार केंद्रात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
————–

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

ज्या पात्र महिला आहेत त्याना हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येईल. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाइल अॅप, सेतु सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ज्यांना अर्ज करता येत नाही, त्यांना अंगणवाडी केंद्रात जावून अर्ज करता येईल. अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. शिवाय त्याला अर्जासोबत आधारकार्ड, रेशनकार्ड , उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक आणि फोटो आवश्य लागणार आहेत. त्याच बरोबर योजनेच्या अटी शतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रही द्यावे लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असेल. शिवाय, अर्ज करताना त्या महिलेने प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी महिलांची गर्दी; प्रशासकीय यंत्रणा कोलमडली; एजंट, दलालांचा सुळसुळाट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!