भक्ती महामार्गावरून काँग्रेसचा सरकारवर हल्ला; रेतीमाफियांना रान मोकळे करण्यासाठीच भक्तीमहामार्ग!
– काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची घणाघाती टीका
– दि. ४ जुलैरोजी चिखली येथील खामगाव चौफुली येथे रस्ता रोकोचा इशारा
बुलढाणा (बाळू वानखेडे) – भक्ती महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. अल्पभूधारक आणि अतिअल्पभूधारक शेतकरी तर जीवनामधून उठणार आहेत. या भक्ती महामार्गामुळे शेतकर्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. या महामार्गाची गरज नसताना कोणी हा प्रस्तावित केला. कोण या महामार्गाच्या पाठीशी आहे हे समजत नाहीये. शेतकरी या महामार्गाच्या विरोधात असल्यामुळे आंदोलन करत आहेत. महामार्गाच्या विरोधात अनेक निवेदन देत आहेत. विधानसभेचे जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्या अधिवेशनापर्यंत या शेतकर्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी आम्ही शेतकर्यांसह आत्मक्लेष आंदोलन करत आहोत. हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची घोषणा या अधिवेशनात झाली पाहिजे. तशा पद्धतीने जीआरसुद्धा निघाला पाहिजे, ही आमच्या सर्व शेतकर्यांची भावना आहे. आम्ही हा महामार्ग रद्द होईपर्यंत लढा देणार आहोत, शेतकर्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढणार आहोत. जोपर्यंत महामार्ग पूर्णतः रद्द करण्याची घोषणा सरकार करत नाही, आणि तशी कारवाई करत नाही, तोपर्यंत आमचे शेतकर्यांचे हे आंदोलन सुरू राहणार आहे, असे सांगून रेतीमाफियांना रान मोकळे करण्यासाठीच हा महामार्गा निर्माण केला जात आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केली. काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकर्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मक्लेष आंदोलन पार पडले. याप्रसंगी राहुल बोंद्रे बोलत होते. या आंदोलनात पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनीदेखील उपस्थित राहून पाठिंबा दिला. तर यानंतर ४ जुलैला गुरुवारी सकाळी ८.३० वाजता नागपूर-पुणे महामार्गावर चिखली येथील खामगाव चौफुली येथे शेतकरी रास्ता रोको करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकर्यांना न्याय देण्यासाठी आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पाठिंबा दर्शविण्यासाठी विविध पदाधिकार्यांनी भेट देऊन सक्रिय पाठिंबा दर्शविला. सर्वप्रथम कृषीदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन करून राजमाता जिजाऊ, संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरकारला हा महामार्ग रद्द करण्याची बुध्दी यावी, अशी प्रार्थना करण्यात आली. सोमवारी दुपारी १२ वाजता या आत्मक्लेश आंदोलनाला सुरूवात झाली होती. या महामार्ग विरोधात सुरूवातीपासूनच ठीकठिकाणी आंदोलने झाली. शासनाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी कळकळीची मागणी शेतकर्यांनी केली. महामार्गासाठी शेतजमिनी अधिग्रहीत झाल्यास शेकडो शेतकरयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच वादग्रस्त ठरलेल्या भक्ति महामार्ग संदर्भातील प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहे. याची कुणकुण लागताच आणखीनच हवालदिल झालेल्या शेतकर्यांचा विरोधदेखील प्रखर झाला आहे. याउपरही शेतकर्यांच्या मुळावर उठलेल्या या महामार्गाचा राजकीय अट्टाहास का? असा सवाल यानिमित्त ऐरणीवर आला आहे. समृद्धी महामार्गापासून सिंदखेडराजा ते शेगाव हा १०९ किलोमीटरचा व ६००० कोटी रूपयांचा हा भक्ति महामार्ग जिल्ह्यातील पाच तालुक्यातून प्रस्तावित करण्यात आला. यामध्ये सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव व शेगावचा समावेश आहे. रस्ते विकास महामंडळने सादर केलेल्या या आखणीला राज्य सरकारने या निर्णयाने शासन मान्यता दिली. दरम्यान, शासन मान्यता मिळाल्यावर शेतकर्यांनी या प्रस्तावित मार्गाला तीव्र विरोध दर्शविला. होळीच्या दिवशी ठिकठिकाणी शासकीय आदेशाची होळी करण्यात आली. शेतकर्यांना संघटित करून त्यांची मोट बांधली. महामार्ग विरोधी कृती समिती गठीत करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी आंदोलने करून हा मार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सुपीक जमिनीतून जाणारा आणि सुमारे ३० टक्के शेतकर्यांना भूमिहीन करणारा हा मार्ग आहे. अलीकडेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अनेक गावांत थाळीनाद करण्यात आला. मुळात कुणाचीच मागणी नसताना या मार्गाचा अट्टाहास कशाला आणि कोणासाठी ? हा शेतकर्यांचा सवाल आहे. सिंदखेडराजा येथून शेगावला जाण्यासाठी चार मार्ग आहेत आणि सुस्थितीत आहे. यामुळे सुपीक आणि लाखमोलाच्या शेतजमिनीवर हा मार्ग बांधण्याचा हेतू काय? असा शेतकर्यांचा सवाल आहे.
चारशेच्यावर शेतकर्यांचा आंदोलनात सहभाग
महामार्ग विरोधी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी यांना महामार्ग रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ, आमदार राजेश एकडे, आमदार धीरज लिंगाडे, नरेश शेळके, जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, बाळाभाऊ भोंडे, प्रा. संतोष आंबेकर, समाधान सुपेकर, डॉ. सतेंद्र भुसारी, डॉ. ज्योती खेडेकर, विठ्ठलराव चव्हाण, दत्ता काकस, दीपक रिंढे, शिवराज पाटील, ज्ञानेश्वर सुरूशे, तुळशीराम नाईक, बिदूसिंह इंगळे, रविंद्र तेजनकर, शिवनारायण म्हस्के, अशोक अंभोरे, प्रमोद अंभोरे, ाfवठोबा अंभोरे, दिलीप सानप, समाधान म्हस्के, गणेश म्हस्के, मदन दायजे, मोहन आरज, मधुकर सानप, विनायक देशमुख, दिलीप खेडेकर, शरद म्हळसने, शिवा म्हस्के, मधुकर वाघ, भास्कर चोपडे, देविदास घेवंडे, प्रशांत पडघान, सौ. वंदना सपकाळ, मनोहर चोपडे, निर्मला दायजे, इंदूबाई म्हळसने, श्रीराम नागरे, संतोष सातव, सुलाबाई म्हस्के, सुभाष गवई, सिदूसिंह इंगळे, बंडू जाधव, वैभव कुडार्कर, मधुकर वाघ, आदी उपस्थिती होती.
———-