शेलोडी, ता. चिखली (राजेंद्र घोराडे) – उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर १ जुलैपासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देत, आणि शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी इयत्ता पहिलीच्या प्रवेशपात्र चिमुकल्यांचे बैलगाडीतून फेरी काढून व औक्षण करून जिल्हा परिषद शाळा, शेलोडी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असतांना, आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिकवण्यात कमी पडत असतांना, जिल्हा परिषद शाळा शेलोडी येथील पटसंख्या मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे शाळेचा उच्च शैक्षणिक दर्जा, शिष्यवृत्ती, आणि नवोदय प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत, यासह शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची मेहनत असल्याचे गावकरी आनंदाने व अभिमानाने सांगतात. शेलोडी शाळेने सन २०१० मध्ये साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धेत सहभागी होऊन जिल्हा स्तरावर पहिला क्रमांक पटकाविला आणि शासनाने शाळेला ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले. यासोबतच मागील तीन वर्षांत शाळेचे २२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले असून, चार विद्यार्थी हे नवोदय विद्यालयात प्रवेशित आहेत, हे विशेष उल्लेखनीय.
यावर्षीसुद्धा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा शेलोडी येथे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे व शाळेत वेगवेगळ्या वर्गामध्ये नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. शेलोडी ही जिल्हा परिषदेची शाळा नेहमीच केंद्राचे केंद्र प्रमुख श्री अनाळकर सर आणि पंचायत समितीचे अष्टपैलू गटशिक्षणाधिकारी आर. आर. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन उपक्रम राबवित असते. म्हणूनच शाळेचा चढता आलेख दिसून येतो. विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी सजवलेल्या बैलगाडीमधून मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यासाठी शेलोडी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती व पालक अंतकरणापासून सहभागी झाले होते. या प्रसंगी इयत्ता पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प तसेच पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले, आणि कृषीदिनी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी शेलोडी गावाचे प्रथम नागरिक सरपंच समाधान रिठे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा समिती अध्यक्ष राजूभाऊ नेमाने, उपाध्यक्ष सोपन घाडगे, शाळेचे मुख्याध्यापक श्री लंके सर, जेष्ठ शिक्षक संजय शेळके सर, प्रदीपकुमार रिंढे सर, शिवाजीराव देशमुख सर, ज्ञानेश्वर सावळे सर, समाधान जाधव सर, अमरदीप जयशेट्टे सर, शिक्षणतज्ज्ञ तुळशीदास रसाळ, संभाजी जाधव, किसन शेवाळे, संतोष बनसोडे, लक्ष्मण गायकवाड, कैलास घाडगे, ज्ञानेश्वर बनसोडे, ज्ञानेश्वर वाळसकर, भागवन तावरे, अमोल नेमाने, तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष रामधन शेवाळे गावातील प्रतिष्ठीत नागरिक यावेळी उपस्थित होते.