Head linesMaharashtraPachhim MaharashtraPune

नाशिक फाटा ते खेडदरम्यान कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी!

चाकण (विशेष प्रतिनिधी) – पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दोन्ही मार्गाच्या कामाची ही निविदा प्रक्रिया सुरू आहे. या महामार्गाच्या निधी उपलब्धतेसाठी पंतप्रधान कार्यालयामध्ये फाइल मंजुरीसाठी गेली आहे. सुमारे आठ हजार चारशे कोटींचे पुणे- नाशिक महामार्गाचे; तर तळेगाव- चाकण- शिक्रापूर मार्गाचे आठ हजार कोटींचे काम आहे. दोन्ही महामार्गांचे काम लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. पुणे- नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी महामार्गाच्या प्रलंबीत कामाबाबत गडकरी यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळासमवेत भेट घेतली होती. याप्रसंगी गडकरी यांनी या शिष्टमंडळाचा आश्वासित केले.
नाशिक फाटा ते खेडदरम्यानचा कॉरिडॉर.

चाकण (ता. खेड) येथील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या कामामुळे वाहतूक कोंडीने नागरिक, उद्योजक, कामगार त्रस्त झालेले आहेत. तसेच, औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या, उद्योग स्थलांतरित होण्याची भीती आहे. त्यामुळे महामार्गाचे काम तातडीने व्हावे, अशी मागणी नागरिकांच्यावतीने मेदगे यांनी केली होती.

मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट देऊन चाकणच्या वाहतूक कोंडीसंदर्भात चर्चा केली होती. यावर तातडीने निर्णय घेण्यात आला आणि नाशिक फाटा ते खेड महामार्गाला मंजुरी दिली आहे. लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

– डॉ. अमोल कोल्हे, खासदार.

माझ्या कालावधीत मी केलेल्या पाठपुराव्याला आता मूर्त स्वरूप आलं आहे. याचा निश्चितच आनंद झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार.

पुणे- नाशिक महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले. खेड, मंचर, नारायणगाव व आळेफाटा या बाह्यवळणाच्या उर्वरित कामाला लवकरच मान्यता देणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाने ७,८२८ कोटी रुपये किंमतीच्या ३० किलोमीटर लांबीच्या, ८ लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. हा कॉरिडॉर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण यांसारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडेल जाईल. या कॉरिडॉरला मंजुरी दिल्याबद्दल मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानलेले आहेत.

ऑक्टोबरपासून कामाला सुरुवात!

‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले, ‘पुण्यातील विविध ठिकाणच्या ‘एलिव्हेटेड महामार्गां’च्या ‘डीपीआर’ला केंद्राने मान्यता दिली आहे. नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटरच्या मार्गांचे भूसंपादन सुरू झाले आहे. या आठ पदरी ‘एलिव्हेटेड महामार्गा’साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ६१ मीटर आणि मोशीच्या पुढे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकारणाने (पीएमआरडीए) राजगुरुनगरपर्यंतची ४५ मीटर जागा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे भूसंपादनाचे काम झाल्यावर येत्या ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात या मार्गाचे काम सुरू होईल. वाघोली ते शिक्रापूर या एलिव्हेटेड महामार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम अद्याप सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!