मनोज जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित!
- नवव्या दिवशी तब्येत प्रचंड खालावली; ५ वाजता करणार अधिकृत घोषणा
– कोर्टाने उपचार घ्यायला सांगितले : मनोज जरांगे पाटील
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या ९ व्या दिवशी उपोषण स्थगित करत असल्याचे सांगितले. मराठा समाजाच्यावतीने मला उपोषण न करण्याचा आग्रह करण्यात आला होता. माझ्या मायमाऊल्यांनी त्यासाठी मला वारंवार विनंती केली. कोर्टानेदेखील उपचार घ्यायला सांगितले. त्यामुळे आपण उपोषण स्थगित करत असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. इतकेच नाही तर ज्यांनी – ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला, त्यांना सोडणार नाही, असा इशारादेखील त्यांनी दिला. ‘आज प्रत्येक शिक्षक अन पोलीस आरक्षणाची वाट बघतोय. आज कोणतेच क्षेत्र असं नाही की तो आरक्षणाची वाट बघत नाही, प्रत्येक क्षेत्रातील मराठा आज आरक्षणाची वाट बघत आहे. फडणवीस साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे, माझा गरीब मराठा आरक्षणाची वाट बघतोय. तुम्हाला संधी आहे ही संधी वाया जाऊ देऊ नका, मी आता राजकीय भाषा बोलणार नाही आचारसंहितापर्यंत, पण तोपर्यंत आरक्षण दिलं नाही तर त्यानंतर मी तुम्हाला कोणालाच सोडणार नाही. माझी भूमिका माझ्यासाठी नाही तर माझ्या समाजासाठी महत्वाची आहे. ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण द्या,’ अशी मागणीदेखील जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
गेल्या नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरू होते. जरांगे पाटील म्हणाले, की ‘माणूस सलाईन घेतली तरी मरतो हे खरंय, तो केवळ २७ दिवस जगू शकतो. रात्री कलेक्टर साहेब, एसपी साहेब आले होते. मी तुम्हाला माझ्या वेदना दाखवत नाही. मात्र काल खूप त्रास झाला म्हणून त्या वेदना दिसल्या. मी हायकोर्टाचा सन्मान करतो, त्यांनी सांगितलं होतं सलाईन घ्या म्हणून मी सलाईन घेतल्या. चिखलात इथं येणार्या बांधवांचे हाल होत आहेत, एकट्या फडणवीस साहेबांसाठी ९ दिवसांचा कडक उपवास झालाय. निवडणुकीपर्यंत जर आरक्षण दिल नाही तर सगळी निवडणूक बिघडवणार आहे, माझ्या स्वतःसाठी मी आंदोलने करीत नाही,’ असा इशारा याप्रसंगी जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आचारसंहिता लागेपर्यंत मी राजकीय भाषा बोलणार नाही. त्यानंतर कोण काय बोलले हे मी सांगतो. मी कोणाला सोडणार नसल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. फडणवीस साहेब तुमच्या हाताने सत्ता पाडू नका, मी काहीच येऊ देणार नाही, नंतर बोंबलू नका. एकदा मी राजकारणाकडे जायचं नाही म्हंटल तरी जाणार नाही. आरक्षण दिलं नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार असल्याचाही इशारा जरांगे पाटलांनी दिला.
मराठा समाजाने कोणत्याही नेत्याच्या सभेला जाऊ नये!
मराठा नेत्यांनी एकमेकांना साथ द्या, मराठा समाजाने कोणत्याही नेत्याच्या सभेला जाऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केले आहे. मराठा समाजातील माता-बहिणी मोठ्या प्रमाणात अंतरवाली सराटी येथे येत आहेत. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाचे हाल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर गावाच्यादेखील काही समस्या आहेत. माता-भगिनींनी मला उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे आता आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंपासून जीवाला धोका; ओबीसी आंदोलकांचा आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासूनच आमच्या जीवाला धोका आहे, असा आरोप ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे. काल रात्री आम्हाला जीवे मारण्यचा प्रयत्न झाला. मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना यथेच्छ प्रसाद दिला. आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही त्यांच्या शिंगावर घेणार, असा इशारादेखील प्रा. हाके यांनी दिला आहे. प्रा. हाके म्हणाले, रात्री एकच्या आसपास चार तरुण आले आणि दोन तरुणांनी स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमच्या तरुणांनी त्यांना प्रसाद दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे हे रात्रीच्या घटनेने सिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला जीवानिशी मारायचे आहे, असा आरोपही प्रा. हाके यांनी केला आहे.
हाके, वाघमारे यांनीही उपोषण सोडले
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केले. तब्येतीचे कारण पुढे करत जरांगेंनी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले. यानंतर थोड्या वेळाने ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले. याप्रसंगी बोलताना जरांगे मुख्यमंत्री झाले किंवा त्यांचा बाप मुख्यमंत्री झाला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणे अशक्य आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.