– भाजपकडून शिंदे गटाला केंद्राच्या सत्तेत वाटा मिळणार?
– शिंदे गटाच्या वाट्याला कॅबिनेट, राज्य मंत्रिपद व एका समितीचे अध्यक्षपद!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. लवकरच होऊ घातलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट किंवा राज्य मंत्रिपद मिळेल, अशी माहिती मुंबईतील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिली आहे. भावना गवळी किंवा प्रतापराव जाधव यांच्यापैकी एकाला तर मुंबईतून राहुल शेवाळे यांना मंत्रिपद मिळेल, असा हा नेता म्हणाला. यापूर्वी आनंदराव अडसूळ हे बुलडाण्यातून शिवसेनेचे खासदार असताना, त्यांना अर्थ राज्यमंत्रीपद केंद्रात मिळाले होते. त्यांच्यानंतर प्रतापराव जाधव यांच्या रुपाने बुलडाण्याला केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची आशा लागली आहे.
बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाजू भक्कम करण्यासाठी, भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिंदे यांच्या समर्थक खासदारांना हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्रात मंत्रिपद देणार आहे. शिंदे गटातून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव सद्या तरी आघाडीवर आहे. या गटाला केंद्रात १२ शिवसेना खासदारांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यातील दोन खासदारांना केंद्रात मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या वाट्याला एक केंद्रीय मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार आहे.
शिवसेनेतून खासदारांचा १२ जणांचा गट बाहेर पडल्यानंतर, शिवसेना ही एनडीएचाच घटक पक्ष असल्याचा दावा या गटाकडून करण्यात आला होता. तसेच याबाबतचे पत्रही लोकसभा अध्यक्षांना देण्यात आले होते. सध्या शिंदे गटाचे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे हे आहेत. तर प्रतोद भावना गवळी या आहेत. आता या १२ जणांपैकी दोन खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी माहिती वरिष्ठ राजकीय नेतृत्वाने दिली आहे. दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आणि एकनाथ शिंदे गटाला पहिल्यांदा पाठिंबा जाहीर करणारे खासदार राहुल शेवाळे यांना यातील एक मंत्रिपद तर विदर्भातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनाही केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, असे या सूत्राने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही काळात अपेक्षित असून, त्यात या दोन जणांचा समावेश करण्यात येईल, असेही हे नेतृत्व म्हणाले.
तीनही संजयांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता कमी!
दरम्यान, राज्याचा पुढील मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, हे सांगणे कठीण आहे. परंतु, या मंत्रिमंडळ विस्तारात मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांच्यापैकी कुणाची मंत्रिमंडळात वर्णी लागेल किंवा नाही, याबाबत अनिश्चितता असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सांगितले आहे. मंत्रिपदासाठी अनेकांची जोरदार लॉबिंग सुरु असून, यापैकी डॉ. रायमुलकर यांच्याकडे असलेले पंचायत राज समितीचे अध्यक्षपद कायम राहील, आणि चिखलीच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असेही या सूत्राचे म्हणणे आहे.