कर्जत (प्रतिनिधी) : यापुढे हिंदूंच्या केसालाही धक्का लागल्यास त्याची गय केली जाणार नाही , असा इशारा आमदार नितेश राणे यांनी कर्जत येथे बोलताना दिला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे शहराध्यक्ष गणेश शिरसागर , भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, सनी पवारचे वडील राजेंद्र पवार तयाचा भाऊ व मोठ्या संख्येने विविध हिंदू संघटनांचे काम करणारे युवक उपस्थित होते.
कर्जत येथील युवक सनी उर्फ प्रतीक पवार याच्यावर नुपूर शर्मा यांचे स्टेटस ठेवतो म्हणून चार ऑगस्ट या दिवशी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये सनी गंभीर रीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान आमदार नितेश राणे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी नगर येथे रुग्णालयामध्ये जाऊन सनी पवार याची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली यानंतर कर्जत येथे भेट दिली. कर्जत शहरांमधून दादा पाटील महाविद्यालया पासून यूवकांच्या समवेत राणे व पडळकर यांनी मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढला. आज कर्जतचा बाजार असल्याने शेवटच्या टप्प्यात बाजारातून श्री गोदड महाराज मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले यावेळी युवकांनी सनी उर्फ प्रतीक पवार याचे फलक हातामध्ये धरले होते . यानंतर हा मोर्चा कर्जत पोलीस स्टेशन वर नेण्यात आला. त्या ठिकाणी त्यांनी या प्रकरणाचा तपास करणारे उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव आणि पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे कडून घडलेल्या घटना बाबत आढावा घेतला. पोलिसांनी कशा पद्धतीने तपास केला आहे याची माहिती घेताना यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी बोट ठेवत चांगलेच खडसावले. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आता राज्यातील सरकार बदलले आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेले आहे उद्धव ठाकरे देखील आता घरी गेले आहेत हे लक्षात घ्या, तुम्हाला वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही. आपण कोणाच्या सांगण्यावरून येथे काम करत असाल तर यापुढे ते चालणार नाही. असा स्पष्ट शब्दात इशारा देखील दिला.
सनी उर्फ प्रतीक पवार याला केवळ नुपूर शर्मा यांचे स्टेटस ठेवल्यामुळेच जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे असे सांगताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणी अपमान करत असेल तर सहन केला जाणार नाही मग तो कोणी का असेना, इथल्या सर्व घडामोडींची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन दोषी असणाऱ्यांवर कारवाई होईल असे यावेळी राणे म्हणाले. पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, कर्जत मध्ये हिंदूंना टार्गेट केले जात आहे त्यांना धमकावले जात आहे स्टेटस ठेवल्यास मारून टाकण्यापर्यंत मजल पोहचली आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस अधिकारी यांची असून ते अप्रत्यक्षपणे याला खतपाणी घालत आहेत. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राहिले नसून हिंदूंचे सरकार आलेले आहे. यामुळे कर्जत मध्ये यापुढे हिंदूंना त्रास झाल्यास त्याची गय करणार नाही.
राणे पुढे म्हणाले की, मी आणि गोपीचंद पडळकर यांनी सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे, या गोष्टीला जे जबाबदार आहेत त्यांना कडक शासन झाले पाहिजे ही आमची मागणी आहे. या घटनेतील सात आरोपींना आज कर्जत येथील न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. घडलेल्या सर्व घटना, मिळत असलेली सर्व माहिती, आणि फिर्यादीने दिलेली तक्रार या अनुषंगाने पोलीस विभाग सर्वच बाबींच्या आधाराने सखोल तपास या ठिकाणी करीत आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिली.