चिखली (तालुका प्रतिनिधी) – घरातील सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, यासाठी वरखेड (ता.चिखली) येथील ग्रामस्थ स्वप्नील निंबाजी सोळंकी यांनी वारंवार ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांना विनंती केली होती. परंतु, ग्रामपंचायतीने आपल्या भोंगळ व गलथान कारभाराचे प्रदर्शन करत, हा प्रश्न मार्गी लावला नाही. त्यामुळे अखेर सोळंकी यांनी आजपासून (दि.८) अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या जीविताचे काही बरेवाईट झाल्यास त्याला सरपंच व ग्रामसेवक हे पदाधिकारी जबाबदार राहणार आहेत.
उपोषणकर्ते ग्रामस्थ स्वप्नील निंबाजी सोळंकी यांच्या घरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे २३/०५/२०२२ रोजी लेखी अर्जाद्वारे विनंती केली होती. या अर्जाला देऊन दोन ते अडीच महिने कालावधी होऊनसुद्धा ग्रामपंचायत वरखेड यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. ग्रामसेवक व सरपंच यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की तुम्ही तुमचे बघा. झालेला प्रकार पंचायत समिती चिखलीचे गटविकास अधिकारी यांना सांगितला असता, त्यांनी सदर प्रकरणी ग्रामपंचायत वरखेडला स्थळपाहणी करावी, त्याच्या घराचे सांडपाणी ज्या दिशेने नैसर्गिक उतार असेल त्या बाजूस सांडपाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी, असे ग्रामपंचायत वरखेडला कळवले होते. तसेच उचित कार्यवाहीचे पत्र ग्रामपंचायत वरखेडला दिले. तरीसुद्धा ग्रामपंचायत प्रशासन पत्राकडे दुर्लक्ष करून कोणताही निर्णय घेतला नाही. सोळंकी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून दि.०८/०८/२०२२ रोजी ग्रामपंचायत वरखेडसमोर अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. माझ्या जीवाला कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्याला ग्रामपंचायत वरखेड व प्रशासन जबाबदार राहील, असेसुद्धा त्यांनी सांगितले आहे.
Leave a Reply