कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत शहरात कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव नसताना व काल झालेला प्रकार हा दोन तरुणामधील भांडणातून घडलेला असताना, त्यास बाहेरच्या शक्ती जातीय तेढ निर्माण करणारी परिस्थिती निर्माण करत असून, कर्जत शहरातील नागरिक हे खपवून घेणार नाहीत. कर्जत शहरातील वाद समोपचाराने मिटविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. बाहेरच्यांनी यात लक्ष घालून येथील वातावरण बिघडवू नये, असे आवाहन कर्जत नगर पंचायत मध्ये झालेल्या सर्व समावेशक व्यापारी, राजकीय पक्ष, पदाधिकारी, व नागरिकांच्या बैठकीत करण्यात आले.
कर्जत ही ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजाची भूमी आहे, आता पर्यत कधीही जातीय वाद येथे झालेला नसताना दोन तरुणामधील भांडणाचा संदर्भ असलेल्या घटनेला जाणून बुजून जातीय रंग दिला जात असून, या मुळे कर्जतचे खूप मोठे नुकसान होणार आहे. कर्जत मधील या घटनेला वेगळे रूप दिले जात असून ते योग्य नाही, शहरात कोणतीही घटना घडली की त्यासाठी कर्जत बंद करणे योग्य नाही, काल कर्जत शहरात जो अचानक बंद पुकारला तो व्यापाऱ्यांना मान्य नाही. जो वाद झाला तो मर्यादित कुटूंबामध्ये झालेला होता, हे सर्वाना माहीत असताना अचानक पुकारलेल्या बंदमुळे अनेक व्यवसाईकांचे मोठे नुकसान झाल्याचे व्यापारी असो. चे सचिव बिभीषण खोसे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करताना कर्जत शहरात जातीय तेढ यापूर्वी कधी नव्हती आज ही नाही व यापुढे ही असणार नाही असे अनेकांनी म्हटले. यावेळी नामदेव राऊत यांनी बोलताना कर्जत मधील वाद पंच कमिटी करून आपण मिटवू असे म्हणत यासाठी लवकरच पुन्हा बैठक घेण्याचे स्पष्ट केले तर प्रवीण घुले यांनी कर्जत शहरात कोणत्याही प्रकारचे तणावाचे वातावरण नाही मात्र राज्यस्तरिय देशपातळीवरील न्यूज चॅनल येथील परिस्थिती जाणून न घेता, आशा बातम्या देत आहेत की जणू येथेव खुप काही घडले आहे. कर्जत शहराततील वातावरण बिघडविण्याचे काम मीडिया मधून केले जात असून चुकीच्या बातम्या करणाऱ्या न्यूज चॅनलचा निषेध करावा लागेल, त्यांनी कर्जत मध्ये यावे येथे कोठे जातीय तेढ आहे का हे स्वतः पाहावे उगाच येथील वातावरण गढूळ करू नये, अन्यथा आम्हाला या विरुद्ध एकत्र लढावे लागेल असे मनोगत प्रवीण घुले यांनी व्यक्त केले.
कर्जत शहरात सनी पवार यास झालेल्या मारहाण प्रकरणी काही बाहेरचे लोक उलट सुलट प्रतिक्रिया देऊन कर्जतला खूप मोठा गुन्हा घडला असल्यासारखे वार्तांकन करत असून हे योग्य नाही. आज काही राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया आल्यानंतर मुंबईत बसून कोणीही प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले, तर अशा पद्धतीच्या बैठकीत प्रशासकीय अधिकारी ही असले पाहिजेत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यानंतर लवकरच सर्व समावेशक बैठक घेतली जाईल असे यावेळी जाहीर करण्यात आले. कर्जत नगर पंचायत कार्यालयांच्या आवारात झालेल्या बैठकीत सुनील शेलार, संतोष म्हेत्रे, रज्जाक झारेकरी, संजय भैलूमे, बिभीषण खोसे, भास्कर भैलूमे, प्रसाद शहा, अनिल भैलूमे, अभय बोरा, सतीश पाटील, नामदेव राऊत, प्रवीण घुले, अंबादास पिसाळ, यांनी मनोगते व्यक्त केली याबैठकीस दीपक शिंदे, अर्जुन भोज, संजय काकडे, समशेर शेख, शब्बीरभाई पठाण, सचिन कुलथे, सचिन घुले, भाऊसाहेब तोरडमल, ऍड अशोक कोठारी, महावीर बोरा, किरण भैलूमे, संतोष भैलूमे, संजय भिसे, दत्तात्रय कदम, राजू बागवान, आदी सह अनेक जण उपस्थित होते. शेवटी रवींद्र सुपेकर यांनी आभार मानले.