“ए गप्प बस तुला काय अक्कल आहे!” असं जर कोणी समजा एखाद्या स्त्रीला म्हणाला तर तिला राग येईल.. हेच जर फेमिनिस्ट स्त्रीला म्हणाला तर ती अधिकच चवताळून उठेल.. हे सार्वजनिकरित्या झालं तर सगळीकडून निषेध होतील, स्क्रीनशॉट्स शेअर होतील, कदाचित मोर्चेही निघतील.. पण हेच वाक्य प्रत्येक धर्म पावलोपावली म्हणतोय, युगानुयुगे म्हणतोय, आणि प्रत्येक धर्मग्रंथाच्या पानापानावरून म्हणतोय, पण त्याबाबतीत मात्र चकार शब्द कोणी काढणार नाहीत, किंवा तितकीशी आक्रमक भूमिका स्त्रिया घेणार नाहीत..
प्रत्येक धर्माने (Note It, प्रत्येकच धर्माने) स्त्रीला एक वस्तू (Object) मानले आहे.. पुरुषांना सुख देणारी आणि पुरुषांसाठीच राबणारी वस्तू.. त्याचं बीज जपणारी आणि वंश पुढं वाढवणारी एक हक्काची वस्तू..
मग ही ‘वस्तू’ उतू नये, मातू नये म्हणून प्रत्येक धर्मानं तिच्यावर बंधनं घातली.. आपल्याकडे मनुस्मृती या ग्रंथाने स्त्री किती दुय्यम आणि कनिष्ठ आहे, हे सांगून तिच्यावर बंधने लादली आहेत. ह्या बंधनांचाही अभिमान बाळगायला तिला परंपरांनी शिकवलं.. तिच्याकडून व्यवस्थेनं व्यवस्थितपणे करून घेतलेल्या त्यागाचं मग सगळ्यांनीच ग्लोरिफिकेशन केलं..
संसारासाठी रितिरिवाजांसाठी कुळाचारासाठी, स्वतःच्या इच्छा आकांक्षा भावना यांचा त्याग करणारीच खरी स्त्री असते, आणि ‘तेच तिच्या जीवनाचं सार्थक!’ वगैरे नॅरेटिव्ह पद्धतशीरपणे सेट केले.. आणि यालाच घरंदाजपणा म्हटलं जाऊ लागलं..
तिनं आकाशात कितीही भरारी मारली तरी पतंगाचा दोर मात्र धर्मानं पुरुषाच्या हातात राहील अशी सोय करून दिली.. मग ‘मॅडम अमुक पदावर आहेत, पण तरीही मुलाबाळांकडे त्यांनी अजिबात दुर्लक्ष होऊ दिलं नाही’ या वाक्यात तिला सौख्य सामावायला लावलं..
काही धर्मानी तर स्त्री ही वस्तू चक्क ‘अमिष’ देण्यासाठी वापरली.. या वस्तूकडे बघून पुरुषांची नजर चाळवू नये म्हणून तिलाच झाकून टाकलं.. गुलाम शब्द लाजेल अशी गुलामी तिच्याकडून करून घेतली, आणि त्याचंही भूषण मानायला तिला शिकवलं..
नवऱ्याच्या लाथा खाता खाता, तो ‘मऊ’ जोड्यांनी मारतोय याचं अप्रूप आणि कळवळा वाटून घ्यायला लावला..
फेमिनिस्ट स्त्रियांनी भाकडकथांना आणि कर्मकांडांना डिफेन्ड करणे तर आणखी मजेशीर असते.. पुरुषप्रधान मानसिकतेचं ‘जू’ अलगद खांद्यावर ठेवणारी सणंवारं, कर्मकांडे आणि पुराणे यांचा विषय येतो, (आणि जेंव्हा धर्ममार्तंड सांगतात की पुराणात लिहिलंय तेच खरं,) अशा वेळी स्त्री कितीही फेमिनिस्ट असेल तर ती धर्माची आणि पुराणांचीच बाजू घेते.. कितीही फेमिनिस्ट असली स्त्री, तरीही ती, ‘तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका हो, त्यातला भावार्थ लक्षात घ्या’.., ‘काही गोष्टी इग्नोर करा हो’.., असं म्हणत मधल्यामध्ये लटकत असते.. बुरखा, घुंगट, हिजाब, मंगळसूत्र, हळदीकुंकू असं कशाकशाला डिफेन्ड करणाऱ्या बुद्धिवादी स्त्रिया लाखोंनी आहेत..
फार मजेशीर आहे हे.. (मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्यात तर हे तर जास्तच कट्टरतेने घडते).. माझ्या आजूबाजूला हिंदू बहुसंख्य आहेत आणि मीही हिंदू संस्कृतीतच वावरलोय म्हणून उदाहरणे हिंदू धर्माबद्दलची जास्त असू शकतात, पण बाकीही धर्म कमीअधिक प्रमाणात स्त्रियांसाठी अक्षरशः नरक आहेत)..
पुरुषी मानसिकतेचं जोखड लाथाडणाऱ्या स्त्रिया, पुरुषी मानसिकतेचं वाहक असणाऱ्या धर्माचं जोखड मात्र साधं नाकारूही शकत नाहीत, हे वास्तव आहे..
वटसावित्री काय, हळदी-कुंकू काय, ‘पती के लंबी उमर के लिये’ व्रत काय.. आणि काय काय… (कुठल्याही स्त्रीला विचारा,.. ती हेच् म्हणते – मलाच आवड आहे म्हणून मी करते!!) .. आणि या दळभद्री आवडीला ‘संस्कृती’ म्हणतात… थोर संस्कृती..! ‘घराण्याची रीत’ वगैरेच्या नावाखाली नव्या नवरीची शुद्ध फसवणूक असते..
‘स्वत:च्या फायद्यासाठी समाजानं बायकांवर लादलेली बंधनं’ म्हणजे संस्कृती.!! अशीच खरी आतली व्याख्या आहे.. या सगळ्या संस्कृत्या बायकांभोवतीच का फिरतात बरं? पुरुषांनी पाळावयाची असली कुठली ‘संस्कृती’ आहे का ?
…खरंतर, सगळे रीतिरिवाज चुपचापपणे पाळणारी एखादी बकरी शोधणं’, एवढीच पुरुषांची संस्कृती आहे..!!
मग संस्कृतीनेच असं पिढीजात लाभार्थी बनण्याची केलेली सोय सहजासहजी कोण पुरुष नाकारेल? पण स्त्रियाही याला स्वतःच मनापासून ‘फॉर’ असतात..
ज्या वयात मुलींना लग्न म्हणजे काय माहित नसतं, त्या वयात कित्येक ‘आया’ आपल्या मुलींना घेऊन “हळदी-कुंकू” वगैरे सारखे गुलामगिरीचे धडे गिरवताना दिसतात.. वटसवित्री हरतालिका हे तर थोरच आहेत..!!
टेक्नॉलॉजी येऊनही काहीही फरक पडला नाही, उलट त्याच रूढी परंपरांचे फोटो नटूनथटून अपलोड करतात, आणि ‘हौस’ या गोंडस नावाखाली अभिमानानं गुलामीची प्रतीकं मिरवतात..
ज्या सुनेनं ह्या सगळ्याचा जाच भोगलाय ती स्वतः सासू झाल्यावर पण तेच करते.. मला किती सासुरवास होता, आणि हिला एवढं पण नको सहन करायला? ही वृत्ती..!
ज्या नणंदेला त्रास होतोय ती भावजयीच्या बाबतीत मात्र तेच रिपीट करते.. यातून बाहेर पडायची, सोबतच्या स्त्रीला ‘माणूस’ म्हणून वागवायची लक्षणंच नाहीत वर्षेनुवर्षं.. अजूनही कित्येक घरांत, ‘पत्नी की जगह तो पती के पैरो में होती है’, म्हणून कित्येक मुलींची मनं नासवली जातात. पाया पडणाऱ्या स्त्रीला फक्त ‘सौभाग्यवती भवः’ असा आशीर्वाद देणे, ही तिच्या आत्मसन्मानाची कुचेष्टाच आहे, हे जोपर्यंत तिला समजत नाही, तोपर्यंत ती संस्कृतीच्या मानसिक गुलामगिरीतच राहणार!
सिनेमा आणि सिरियल्स मधून अशाच निरर्थक गोष्टीना प्रोजेक्ट केलं जातं. मराठी मनोरंजक वाहिन्यांवर आज सर्वत्र हाच विषय घुसडून ऊत आहे. मूळ विषय, मूळ महत्त्व अधोरेखित न करता कर्मकांड अधिक प्रमोट करताहेत. सिनेमात, टीव्हीत ‘हवं तर सगळे दागिने न्या, पण माझं मंगळसूत्र नका हो घेऊ’, असा डायलॉग नायिका मारते तेंव्हा तुमचा ऊर अभिमानानं भरून येत असेल, तर तुमच्याही डोक्यात फॉल्ट आहे! कुंकू पुसणं, दिवा विझणं, मालिकांमधल्या स्त्री पात्रांचे कुंकू लावून, दागदागिने मंगळसूत्र घालून मिरवणं, आणि त्यावरूनच्या सण समारंभातल्या उखाळ्यापाखाळ्या, हे काय दर्शवते..?
बुद्धिमत्ता, माया, धडाडी आणि हिंमत या आणि अशा महत्वाच्या गुणांपेक्षा “नवरा असणं” जास्त महत्त्वाचं असंच सूचित करणाऱ्या या प्रथा/प्रतीकं अजून किती काळ चालू ठेवायच्या.? उपासतापास स्त्रीने करायचे; नवरा, भाऊ, मुलंबाळं यांच्यासाठी व्रतवैकल्ये स्त्रीने करायची, कुंकू मंगळसुत्रासहित अंगभर तिने नवरा दाखवायचा, आणि नवरा मेल्यावर त्याच समाजाने तिला (सांस्कृतिक) वाळीत टाकायचं.. आणि अशा विविधतेने नटलेल्या परंपरांचा आपण मात्र अभिमान बाळगायचा..!! कुठवर चालायचं हे..? कर्मकांडाच्या आणि धार्मिक श्रध्दांच्या नावाखाली असले सरळसरळ ‘विषमतेला’ खतपाणी घालणारे रिवाज किती वर्षं पाळायचे? पुराणातल्या भाकडकथांना आणि त्यात लिहिलंय म्हणून स्यूडोसायन्स पसरविणाऱ्या थोतांड समजुतींना किती काळ डिफेन्ड करायचं?
आणि यावर बोललं लिहिलं की स्त्रियाच जास्त डिफेन्ड करायला पुढे येतात..
फार मजेशीर आहे हे..
“घरच्यांना बरं वाटावं म्हणून पाळते मी प्रथा”.. हे सगळ्यात कॉमन तुणतुणं ऐकायला मिळतं…
“छान वाटतं हे केल्यावर, मग जास्त विचार करायचा नसतो ओ” असंही लॉजिक लावलं जातं.. आणि वर, “हे केल्याने तोटा काय आहे मला सांगा!” असेही अकलेचे तारे तोडले जातात..
… मग ह्याच स्त्रिया स्वतःला फेमिनिस्ट समजतात.. कोणी त्यांची अक्कल काढली की धावून येतात.. पण अक्कल गहाण ठेवणाऱ्या प्रथा, अकलेचे दिवाळे काढणाऱ्या परंपरा, आणि त्यांना पाठबळ देणारा धर्म, यावर मात्र चकार शब्द काढत नाहीत! हा कसला अर्धवट फेमिनिझम?
नवऱ्यानं शिळी चपाती खायला सांगितली तर ती अजिबात खाणार नाही, पण परंपरा शेण खायला लावते, ते तिला भूषण वाटतं.. आणि वर उत्तर, ‘मी हौस म्हणून करते, मला कोणाची बळजबरी थोडीच आहे!’..
“अगं ताई, पण तुझ्यावर ही अदृश्य आणि अप्रत्यक्ष सांस्कृतिक बळजबरीच आहे, हे तुझ्या लक्षात येतंय का? आणि हे सगळं पुरुषसत्ताकतेच्या भोवतीच फिरतंय हे तुला कळत नसेल तर तुझा फेमिनिझमच फुसका आहे.. आणखी किती दिवस तू फेमिनिझम च्या नावाखाली फक्त पुरुषांनाच झोडपत राहणार आहे? पुरुषांना ‘पुरुष’ बनविणाऱ्या, अन तुला अडवू पाहणाऱ्या धार्मिक व्यवस्थेला कधी बोलणार? या पुरुषसत्ताक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पोथ्यापुराणांना कधी झोडपणार? अगं, इथं ‘फेमिनिझम आणि धार्मिकता’ हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असावेत इतकी योजनाबद्ध परिस्थिती आहे, हे तुझ्या लक्षात येतंय का? तुला व्यवस्थेनं एका बैलगाडीला जुंपलंय, त्यात तुझ्या खांद्यावर धर्माचं जोखड आणि नाकात पुरुषसत्ताकतेचं वेसण घातलंय.. यातून तुला मुक्त व्हायचं असेल तर खांद्यावरचं धर्माचं जोखड आणि पुरुषसत्ताकतेचं वेसण दोन्ही तुला एकत्रच काढावं लागेल! हे तुला लक्षात येतंय का? वर, ज्या पुरूसत्ताकतेच्या माध्यमातून धर्म तुला अश्रू देतोय, त्यावर उपाय/विरंगुळा म्हणून तू त्याच्याच परंपरागत रितिरिवाजांतुन मनोरंजन (किंवा स्वतःचा अवकाश) शोधत असशील, तर तू ही त्याच अश्रूंच्या लायकीची आहेस, हे नक्की!!”
खरंतर धर्म हे गुलामांना त्यांची गुलामी ‘साजरी’ करायला लावण्यातही यशस्वी होतात, आणि हेच त्यांच्या यशाचं गमक असते..