▪️ कविवर्य विठ्ठल वाघ यांचे प्रतिपादन
देशोन्नती..✍️ राजेंद्र काळे
शेतकरी व कष्टक-यांसाठी कायम संघर्ष करणा-या रविकांत तुपकर यांना लोकवर्गणीतून बहाल केलेला हा लोकरथ, त्यांच्या चळवळीला गती देणारा ठरावा.. असे प्रगतीमान प्रतिपादन ‘तिफन’कार कवीवर्य विठ्ठल वाघ यांनी केले. मृग नक्षत्रात सुरु झालेल्या पावसाच्या उघडझीपमुळे आधी मोकळ्या मैदानावर, नंतर सभागृहात व तुडुंब गर्दी झाल्यामुळे रात्री उशीरा पुन्हा बुलडाणा अर्बन रेसीडेन्सीच्या हिरवळीवर हा वाहन प्रदान अर्थात ‘कृतज्ञता सोहळा’ अक्षरश: अभूतपुर्व ठरत उपस्थितांना करुन गेला तो, भावचिंब!
रविकांत तुपकर अन् संघर्ष, हे समीकरण या कृतज्ञता सोहळ्यातही कायम राहीले. पावसामुळे आयोजकांची तिनदा धावपळ झाली तरीही, अखेर हा सोहळा ठरला भावनिकतेने भिजवणारा!
रविवार १२ जून रोजी रात्री ८ वाजता सुरु झालेल्या या कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते कवीवर्य विठ्ठल वाघ, तर प्रमुख अतिथी म्हणून ‘पद्मश्री’ पोपटराव पवार, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, केंद्रीय आरोग्य सचिव ओमप्रकाश शेटे, जेष्ठ संपादक संदीप काळे, माजी मंत्री ना.महादेव जानकर यांच्यासह बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी.
तुतारी व ढोल-ताशांच्या गजरात रविकांत तुपकरांची ‘एन्ट्री’ कार्यकर्त्यांच्या खांद्यावरुन होताच, एकच जल्लोष झाला. छत्रपती शिवरायांच्या मुर्तीच्या साक्षीने काळ्या मातीचे पुजन व बैलजोडीला अभिवादन करुन प्रा.अनघा पाटील यांच्या सुश्राव्य जिजाऊ वंदनेचे ह्या सोहळ्याचा आरंभ होवून ‘जहाँ रुकेंगे दुनिया के कदम, आगे वहीं से निकलेंगे हम.. जहाँ से आगे निकलेंगे हम, वही एक नया आगाज होगा!’ या शायर डॉ.गणेश गायकवाड यांची ओळी उद्गृत करुन पत्रकार राजेंद्र काळे यांनी या सोहळ्याच्या आयोजनामागची भूमिका प्रास्ताविकातून विषद केली. नंतर तुपकर यांचा संघर्षपर एका चित्रफितीच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे सादर झाला, त्यानंतर झाला वाहन प्रदान सोहळा. मान्यवरांनी रविकांत तुपकर व सौ.शर्वरी तुपकर यांच्या हाती चावी सोपविली. दिवंगत राणा चंदन यांच्या मातोश्री शांताबाई व पत्नी किरण चंदन यांच्याहस्ते नव्या वाहनाची विधीवत पुजा करण्यात आली. १० आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना यावेळी सांत्वननिधी देण्यात आला, तर सत्यपाल महाराज चालवत असलेल्या प्रबोधन शिबिरास तुपकर परिवारातर्फे सहाय्यता निधी देण्यात आला.. एवढी रवीकांतचे आई-वडील चंद्रदास व गिताईचाही भावनिक सत्कार करण्यात आला, अन् मग सुरु झाली नंतर मान्यवरांची मनोगते!
विठ्ठल वाघ पुढे म्हणाले की, तुपकरांचा संघर्ष खूप मोठा असून त्यांच्या चळवळीला हे वाहन निश्चितच गती देईल. ‘वाहन तुझे गतीमान होवो, झेंडा लावत कृषीक्रांतीचा..’ ही खास तुपकरांसाठी तयार केलेली कविता त्यांनी सादर केली. संदीप काळे यांनी रविकांत तुपकर यांच्या पाठीशी महाराष्ट्रातला मित्रवर्ग असल्याचे सांगून, याठिकाणी उपस्थित झालेला त्यांचा चाहता वर्ग हीच त्यांची खरी संपत्ती असल्याचे सांगितले. चुका होतात, पण चुकलेला निर्णय दुरुस्त करण्याची क्षमता तुपकरांच्या नेतृत्वात असल्याचे त्यांनी सांगून हा सोहळा अभुतपूर्व असल्याचे सांगितले. ओमप्रकाश शेटे म्हणाले की, महाराष्ट्रातला कोणताही एखादा अधिकारी वा ठेकेदार तुपकरांना सहज गाडी घेवून देवू शकला असता, मंदीर कोणताही एखादा श्रीमंत व्यक्ती बांधू शकतो, पण ते लोकवर्गणीतून जेंव्हा बनते तेंव्हा त्याची प्रतिष्ठापणा होती. त्याअर्थाने लोकवर्गणीतून आलेल्या या गाडीची ही खऱ्या अर्थाने प्रतिष्ठापणा म्हणावी लागेल, त्याअर्थानं हा ‘लोकसोहळा’ असल्याची उपमा या वाहन प्रदान सोहळ्याला शेटे यांनी दिली.
पोपटराव पवार यांनी शेतकरी संघटनेतील एक राज्यव्यापी नाव रविकांत तुपकर यांचे असल्याचे सांगून, दुषीत पाणी व दुषीत माती यावर प्रबोधन केले. सत्यपाल महाराज यांनी रविकांत तुपकर हे जातीपलीकडचे व्यक्तीमत्व असल्याचे सांगून कोणत्याही सत्तेत नसतांना तुपकर यांच्यासाठी होत असलेला हा अभुतपूर्व सोहळा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या भावनेचे प्रतिक असल्याचे सांगत मार्मिक किस्स्यांतून कार्यक्रमात हास्य पिकविले. राधेश्याम चांडक यांनी अर्जुनराव वानखेडे यांनाही अशीच लोकांनी गाडी घेवून दिली होती, याची आठवण देत त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात तुपकरांसाठी हा दुसरा वाहन प्रदान सोहळा होत असल्याचे सांगत.. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाल्याचे भाईजी म्हणाले.
काही नको, फक्त समर्थ साथ द्या..
▪️रविकांत तुपकर यांचे भावनिक स्वर
हा भावचिंब सोहळा पाहून रविकांत तुपकर इतके भारावून गेले होते की, काय बोलावे? हेच त्यांना सुचत नव्हते. पुर्णवेळ लोकांसाठी जगलेल्या राणा चंदन यांची आठवण त्यांनी आरंभीच काढून ते भावूक झाले.
तुपकर पुढे म्हणाले की, बुलडाणा शहर हे संबंधाचे शहर असून या शहरात चांगली काम करणा-यांची दखल घेणारी माणसं आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसाप्रमाणे विदर्भातील कापूस-सोयाबीनसाठी आंदोलनांच्या माध्यमातून लोकांमध्ये लढण्याचं बळ निर्माण करता आलं. लाल दिव्यात जीव गुदमरत असल्याने तिचा त्याग करुन एस.टी.ने बुलडाणा आलो. तेंव्हापासून वाहन घेवून देण्याचं मित्र मंडळींचं स्वप्न होतं, ते आज साकार झाले. या वाहनात राजकारणी, ठेकेदार, अधिकारी, रेतीमाफीया यांचा एक रुपयाही नको.. अशी अट आधीच ठेवली होती. या माध्यमातून क्षीण होत असलेल्या चळवळीला बळकटी देणारा समाज असल्याचे प्रत्यंतर आले. आयुष्यात काही झालो नाहीतरी चालेल, पण ही साथ सोडू नका.. असे भावनिक आवाहन शेवटी तुपकर यांनी केले.
▪️ कार्यक्रमाचे सुमधूर सुत्रसंचालन अहमदनगर आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका विणा दिघे यांच्या सुरेल आवाजात झाले. हिमांशू बक्षी यांच्या बासरीने कार्यक्रमात सुरेल स्वर भरले. मंचासमोरच रांगोळीतून हुबेहूब रविकांत तुपकर सौ.निता रविंद्र सावळे यांनी साकारले होते. प्रभुकाका बाहेकर व संदीपपाल महाराज यांचीही उपस्थिती होती. आभार प्रदर्शन पत्रकार संदीप चव्हाण यांनी केले. पावसाळी वातावरणातही अडीच ३ हजारावर जनसमुदाय तब्बल ५ तास या कार्यक्रमासाठी खिळून होता. रविकांत तुपकर मित्रमंडळाने कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी बुलडाणा शहरासह ग्रामीण भागातूनही मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Published in Daily Deshonnati, Today, 14 June 2022)