कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे स्व. दिनेश रोडे (सर) यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त विविध क्षेत्रातील सहा व्यक्तींना स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
उत्कृष्ट चित्रकार, पत्रकार, शिक्षक, साहित्यिक, व सर्वच समाजात मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व म्हणून रा. ना. उर्फ दिनेश रोडे सर यांचा परिचय होता त्यांनी आपल्या कार्यकाळातील अनेक वर्षे कर्जत मध्ये आपल्या कर्तृत्वाने एक काळ गाजवला, उत्कृष्ट चित्रकार असलेले रोडे सर यांनी अभ्यासु पत्रकार म्हणून अनेक प्रकरणे धसास लावली. साहित्य क्षेत्रात त्यांनी आपल्या कविता सह विविध अंगी लेखनाने प्रबोधन केले, तर शिक्षण क्षेत्रात त्यांनी चित्रकला या विषयात अनेक विद्यार्थी घडवले,. मुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले, निवृत्तीनंतर ही ते विविध क्षेत्रात कार्यरत होते. रोडे सर यांंचे एक वर्षांपूर्वी अकस्मात निधन झाले त्याच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ज्या ज्या क्षेत्रात तेे कार्यरत होते त्या क्षेत्रात कर्जत तालुक्यात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणार्या व्यक्तींना गौरविण्याचा संकल्प त्याच्या कुटुंबीयांनी घेतला व एक भव्य कार्यक्रमात रा.ना. उर्फ दिनेश रोडे राज्यस्तरिय स्मृती पुरस्कार देण्यात आले.
यामध्ये चित्रकार म्हणून मजहर सय्यद, पत्रकार म्हणून आशिष बोरा, शिक्षक म्हणून दिपक लांगोरे, साहित्यीक म्हणून स्वाती पाटील तर सामाजिक क्षेत्रात कार्य करत असल्याबद्दल स्वाती ढवळे यांना गौरविण्यात आले. तर कर्जत शहरात गेली दोन वर्षे सलग श्रमदान करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेचा व श्रमप्रेमी शिलेदाराचा ही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगराध्यक्षा उषा राऊत या होत्या. प्रास्ताविक करताना डॉ. अतुल रोडे यांनी आपल्या वडिलांच्या इच्छे प्रमाणे आपण कर्मकांडा ना फाटा दिला असून त्यानी काय कमावले हे त्याच्या जान्यानंतर ही आम्ही अनुभवतो असल्याचे म्हटले व ते ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत होते त्या त्या क्षेत्रांत चांगले काम करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्याचे ठरविल्याचे म्हटले.
यावेळी प्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाने उपस्थितांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग करणारे विचार मांडताना कला, लेखन माणसाला अमर बनवते ते शरीराने आपल्यात नसले तरी विचाराने, कलेने जिवंत असतात. कलाकार माणसे आपल्या धुंदीत जगत असतात. कला माणसाला काहीतरी वेगळे करण्याची क्षमता वाढते. मात्र आज सर्वजण नुसत्या मार्कांच्या मागे पळत सुटले आहेत. पालकांनी, शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद झाला पाहिजे. सर्व शिक्षण मार्कांसाठी सुरु आहे. पण प्रत्येकाने अवांतर पुस्तके वाचनाकडे वळले पाहिजे. काही तरी वेगळे केलेल्या लोकांचीच नोंद इतिहासात होत असते. पैसे कमविणे म्हणजे जीवन नाही व फक्त नोकरी करूनच पैसा मिळू शकतो हा भ्रम डोक्यातुन काढून टाका ज्या दिवशी आपल्या कर्तृत्वावर आई वडील टाळ्या वाजिवतील तो दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा असेल. आई बापाला अभिमान वाटेल असे कर्तृत्व कमवा. आई वडिलांचा आदर करा. जिवंत माणसांना जपा ती गेल्यानंतर परत संवाद नाही. असा मोलाचा सल्ला दिला.
यावेळी रोडे सरांच्या पत्नी छायादेवी रामकृष्ण रोडे, व जयंती रोडे बनकर यांनी सर्वांचे स्वागत केले या कार्यक्रमास प्रसिद्ध कवी प्रकाश घोडके, माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलूमे, माजी वन अधिकारी अनिल तोरडमल, सचिन पोटरे, दादासाहेब सोनमाळी, सत्यजित मच्छिंंद्र सुनिल यादव, नेटके सर अभंग सर, खंडागळे सर, तात्यासाहेब ढेरे, अमृत काळदाते, विठठल सोनमाळी, नितीन देशमुख, नितीन तोरडमल, समीर ढेरे, रामदास हजारे, प्रा..चंद्रकांत राऊत, मिलिंद सोबलेसाहेब, भांड साहेब, चंद्रकांत जमदाडे, दिपक शिंदे, सुभाष तनपुरे, रयतचे सेवकवृंद, विद्यार्थी व शिक्षकवृंद यांच्या सह महात्मा गांधी विद्यालय, अमरनाथ विद्यालय व समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. या तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक हे उपस्थित होते. याशिवाय सर्व सामाजिक संघटना, कर्जत पत्रकार संघ, हरित अभियान चे सदस्य उपस्थित होते. शेवटी पृथ्वीराज रोडे यांनी आभार मानले.