कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत शहरातील वालवड रोडवरील मूळ ओढ्याचा वाहता प्रवाहच बंद केला गेल्याने विठाई नगर मधील परिवर्तन कॉलनीत रस्त्याचे पाणी शिरत असून यामुळे या कॉलनी तील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करून आंदोलन करून ही याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्या गेल्यामुळे येथील नागरिकांना दारातून नदी वाहत असल्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. वालवड रस्त्यावर पूल न झाल्यामुळे व पावसाचे पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने सार्वजनिक जागेवरील सर्व ठिकाणचे पाणी या ठिकाणी येत असून, याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. याविरुद्ध परिवर्तन कॉलनीतील कुटुंबानी कर्जत वालवड रस्त्यावरील खड्यातील पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
परिवर्तन कॉलनी जवळ 3 गुंठ्या च्या प्लाँटवाल्यानी अतिक्रमण करत 12 गुंठे जागा बळकावली असून, यामुळे हे पाणी मूळ ओढ्याकडे न जाता थेट कॉलनी च्या रस्त्यावरून वाहून जात आहे, तर काही लोकांनी ओढ्यावरच अतिक्रमण करत आपल्या इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न निर्माण झाला असून वालवड रस्त्याच्या बाजूच्या हजरत दावल मलिक संस्थेच्या जागेतून येणारे सर्व पाणी याच ठिकाणी येत आहे. पाऊस उघडल्या नंतर दोन दोन दिवस हे पाणी वाहत राहते. या पाण्याबरोबर साप, विंचू वा इतर प्राणी याच बरोबर सगळी कडील घाण आमच्या गल्लीत येत असून, घरात शिरणारे पाणी काढण्याचा त्रास पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागाची पाहणी करून ओढा व पाण्याचा नैसर्गिक स्रोत मोकळा करावा. अन्यथा आम्हाला मुला बाळा सह आंदोलन करावे लागेल, असा इशारा परिवर्तन कॉलनी तील विक्रम कांबळे, श्याम भोसले, वाळके, अमर राऊत, कैलास गोसावी, संतोष शिंदे, विशाल शिंदे, अशोक बचाटे, कैलास सुपेकर, गायकवाड, यांचे इतर सर्वानी दिला आहे.