– दारू वाहतूक करताना पकडलेली अॅक्टिव्हा सोडण्यासाठी स्वीकारली २० हजारांची लाच
धुळे (ब्युरो चीफ) – दारू वाहतूक करतांना मिळून आलेली दुचाकी सोडण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणार्या पोलीस हवालदारास लाचुचपत प्रतिबंधक विभागाने पंटरासह ताब्यात घेतले आहे. या कारवाईने पुन्हा एकदा पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा होत आहे.
तक्रारदार यांचे अॅक्टिव्हा हे दुचाकी वाहन ओळखीचे तरुण १० मिनिटाच्या नावाखाली घेऊन गेले. नंतर तेच वाहन सोनगीर पोलिसांनी दारू वाहतूक करत असताना पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल न करता वाहन सोडून देण्याच्या बदल्यात सोनगीर पोलीस ठाण्यातील संजय जाधव नामक पोलिसाने तक्रारदार यांच्याकडे ७५ हजार रुपयांची मागणी केली. यावेळी तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याची तक्रारदार यांनी तयारी दाखवत, धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुपत विभागाने या तक्रारीची शहानिशा केली असता, त्यात तथ्य आढळून आल्याने आज सायंकाळी तालुक्यातील देवभाने फाटा येथे पथकाने सापळा लावला. यावेळी संशयित पोलीस कर्मचारीसह खाजगी पंटर ज्ञानेश्वर कोळी यास २० हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.