अजीम नवाज राहीच्या सुश्राव्य सूत्रसंचालनात होणार निमंत्रितांचे कवीसंमेलन !
बुलढाणा (राजेंद्र काळे) – साने गुरुजींची साहित्य नगरी अमळनेर, याचठिकाणी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. साहित्य संमेलनात सर्वात गाजते ते, निमंत्रितांचे कवी संमेलन. या बहुचर्चित कवी संमेलनाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी यावेळी ज्यांच्या सूत्रसंचालनात्मक प्रवासाला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा अजीम नवाज राही यांच्या वाणीत्मक खांद्यावर सोपविण्यात आली आहे. हे कवीसंमेलन शनिवार ३ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता मुख्य सभामंडपात होणार असून, त्यासाठीची काव्यात्मक उत्कंठा शिगेला पोहचली आहे!
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वांग्मय मंडळ अमळनेर द्वारा आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरच्या पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये सुरू झाले आहे. खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठ या मुख्य सभामंडपात ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अजीम नवाज राही यांच्या सूत्रसंचालनात व प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या निमंत्रिताच्या कवी संमेलनात गितेश शिंदे, मेघना साने, प्रथमेश पाठक, कीर्ती पाटसकर, वैभव वऱ्हाडी, सुजाता राऊत, नरसिंह इंगळे, अभय दाणी, भारत सातपुते, आशा डांगे, माधुरी चौधरी, हबिब भंडारे, कविता मुरूमकर, धनंजय सोलकर, देवा झिंजाड, कांचन प्रसाद, चैतन्य मातुरकर, नरेंद्र कन्नाके, राम वासेकर, गणेश भाकरे, अमोल गोंडचवर, हर्षदा कुलकर्णी, पौर्णिमा केरकर, माधुरी खरडेनवीस, आनंद जाधव, डॉ. संजीवकुमार सोनवणे, बी. एन. चौधरी, रतन पिंगट, मीनाक्षी पाटील, मारुती कटकधोंड, जिजा शिंदे, प्रा. सुमती पवार, गणेश खारगे, व्यंकटेश कुलकर्णी, अमृता नरसाळे व रवींद्र लाखे आदी कवी या संमेलनात सहभागी होणार आहे.
▪राहींच्या लक्षवेधी सूत्रसंचालनाकडे लक्ष..
अजीम नवाज राही यांचे सूत्रसंचालन म्हणजे कार्यक्रमाच्या यशस्वीतेचा पासवर्ड, त्यामुळे या कवी संमेलनातील त्यांच्या निवेदनाकडे लक्ष लागून राहणे साहजिक आहे. सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात ४० वर्षे पूर्ण होत असताना, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राही यांच्याकडे सूत्रसंचालन येणे हे काव्यक्षेत्रात मानाचे समजले जात आहे. लेखणी व वणीच्या दोन्ही गडांवर ४० वर्षापासून अजीम नवाज राही यांच्या वांग्मयीन कर्तुत्वाचा झेंडा दिमाखात फडकत आहे.