बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा तालुका, परंतु चिखली विधानसभा क्षेत्रातील धाडनजीकच्या सावळी येथील रहिवासी विशाल नरवाडे यांची राज्य सरकारने बुलढाणा जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. नरवाडे हे २०१९च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी कळवण येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले असून, कठोर शिस्तीचे तरूण अधिकारी म्हणून त्यांची प्रशासकीय सेवेत ओळख आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या गलथान कारभाराला ते आता चांगलेच वळण लावतील, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यांनी आजच आपला पदभार स्वीकारला.
मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची छत्रपती संभाजीनगर येथे सिडकोच्या मुख्य प्रशासकीय अधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्या बदलीनंतर बुलढाणा येथे कोण येणार हा प्रश्न होता. राज्य सरकारने विशाल नरवाडे यांना येथे संधी दिली आहे. नरवाडे यांना यानिमित्ताने ‘होम डिस्ट्रिक्ट’ मिळाले आहे. मूळचे अभियांत्रिकीचे विद्यार्थी असलेले विशाल नरवाडे हे २०१६ मध्ये भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले होते. परंतु, त्यानंतर पुन्हा एकदा संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा ९१ व्या रँकमध्ये उत्तीर्ण होत २०१९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत संधी प्राप्त केली होती. आयएएस झाल्यानंतर उत्तराखंड येथील मसुरी येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती केंद्र सरकारच्या सेवेत नवी दिल्ली येथे झाली होती. तेथे त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी, कळवण येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रशासकीय सेवेत धडाडीचे व कठोर शिस्तीचे तरूण अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
सीईओ पदाचा पदभार स्वीकारला!
कालच विशाल नरवाडे यांच्या लग्नाचा स्वागत समारंभ पार पडला होता. या सोहळ्याला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. 31 तारखेला हा सोहळा धाड येथे पार पडला होता. तर 28 तारखेला विवाह साेहळा झाला होता. त्यांच्या पत्नी तेजस्विनी यादेखील सनदी अधिकारी असून, उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. काल स्वागत समारंभ होताच, आज त्यांनी नियुक्तीचे आदेश स्वीकारून थोड्या वेळापूर्वीच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
विशाल नरवाडे हे धाडनजीकच्या सावळी गावातील रहिवासी आहेत. त्यांचे वडिल डॉ. तेजराव नरवाडे हे शेतकरी असून, पशुधन विकास विभागात सेवेत होते. आई सविताताई नरवाडे या अंगणवाडी सेविका होत्या. शेतकरी कुटुंबातील असलेल्या विशाल यांनी अतिशय कठीण परिस्थितीतून केवळ उत्तुंग बुद्धिमत्तेच्या जोरावर सनदी अधिकारी पदाला गवसणी घातलेली आहे. लहानपणापासून हुशार असलेल्या विशाल यांनी इयत्ता पाचवीतच जवाहरलाल नेहरू नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण होऊन जेएनव्ही शेगाव येथे पुढील शिक्षण केले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या बहीण प्रतिभा नरवाडे यादेखील जेएनव्हीची परीक्षा उत्तीर्ण होऊन शेगाव येथे दाखल झाल्या होत्या. लातूरच्या राजर्षि शाहू महाविद्यालयातून त्यांनी ११ वी व १२ वीचे शिक्षण लातूर पॅटर्नमध्ये उत्तीर्ण केले. आयआयटी जबलपूर येथून त्यांनी अभियांत्रिकी (बीटेक)चे पदवीचे शिक्षण पूर्ण करून लाखो रुपयांच्या पॅकेजसह बेंगळुरू येथे नोकरी पत्कारली. परंतु, ही गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचे निश्चित केले. २०१६ मध्ये संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते आयपीएस झाले. तीही नोकरी सोडून देत त्यांनी २०१९ मध्ये संघ लोकसेवा आयोगाची कठीण अशी परीक्षा ९१ व्या रँकमध्ये उत्तीर्ण होत आयएएस झाले. त्यांच्या या उत्तुंग यशाने बुलढाण्याच्या गुणवत्तेला देशात तोड नाही, हे स्पष्ट झाले होते. बुलढाणा येथे सर्वोत्तम सेवा देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केली आहे.
——