Head linesNAGARPolitical NewsPolitics

भाजप तालुकाध्यक्षांच्या गावातच गावकर्‍यांनी केला खा.विखेंचा पाणउतारा!

– साखर, दाळवाटप व विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमात रंगले राजकीयनाट्य!

नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – पाच वर्षात काय केले, असा सवाल संतप्त भालगाव ग्रामस्थांनी नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांना त्यांच्या तोंडावर व भरकार्यक्रमात केला. याप्रश्नाने खा. विखे यांची गोची झाली. यावेळी आमदार मोनिका राजळे, पाथर्डी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांचीही उपस्थिती होती. खासदारांना बोलू द्या, ही आमदारांची विनंतीही लोकांनी ऐकली नाही. शेवटी कसे तरी थोड्यात आटोपून खा. विखेंनी गावातून काढता पाय घेतला. विशेष बाब म्हणजे, भालगाव हे तालुकाध्यक्ष खेडकर यांचे गाव आहे. त्यांच्याच गावात खासदारांचा असा पाणउतारा झाल्याने राजकीय आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सविस्तर असे, की भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांच्या भालगावमध्ये शेतकर्‍यांनी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या कार्यक्रमाला जाहीररित्या तीव्र विरोध करून पाच वर्षातील कामाचा जाब विचारला. त्यामुळे खासदार विखे यांची चांगलीच गोची झाली. खासदार विखे व आमदार मोनिका राजळे यांचा पाथर्डी तालुका दौरा सुरू असतानाच तालुक्यातील भालगाव या ठिकाणी खासदार विखे व आमदार राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साखर, दाळ वाटप व विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार सुजय विखे यांचे भाषण सुरू असताना त्यांच्यासमोर उभे असलेल्या शेतकर्‍यांनी खासदार विखे यांना सवाल करत तुम्ही आमच्या गावात पाच वर्षात काय विकास केला हे आधी सांगा, येथून निघून जा.. तुम्ही गत पाच वर्षात काय केले? अशा भाषेत सवाल केला. सर्वसामान्य लोकांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करून प्रचंड विरोध करत कार्यक्रमात गोंधळ घातला. हा गोंधळ पाहून आमदार मोनिका राजळे ह्या व्यासपीठावरून उठून त्यांनी गोंधळ घालणार्‍या लोकांकडे जाऊन शांत राहण्याची वेळोवेळी विनंती करून खासदार विखे यांचे ऐकून घ्या.. तरी पण लोकांचा प्रश्नांचा जोरदार भडिमार विखे यांच्यावर सुरू होता. खासदार म्हणून तुम्ही पाच वर्षात काय केले सांगा, असा सवाल येथील काही ग्रामस्थ, शेतकरी व नागरिकांनी विखे यांना केला.
त्यावर विखे म्हणाले सांगतो मी, परंतु मात्र पुन्हा ग्रामस्थांनी खासदार यांना प्रश्न करत काय.. काय सांगता तुम्ही आम्हाला. तुमच्या योजना येऊन द्या मगच बोला, अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतल्याने येथील वातावरण चांगलेच तापले होते. कार्यक्रम स्थळी बराच काळ जोरदार गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. व्यासपीठाच्या बाजूने खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर उभे होते तर गावातील असंख्य ग्रामस्थ त्यांच्यासमोर बसलेले तर काही ग्रामस्थ तिन्हीचारी बाजूने उभे होते. सर्वत्र एकच गोंधळ सुरू होता. आमदार राजळे यांनी खासदारांना बोलू द्या, अशी वारंवार विनंती गोंधळ घालणार्‍या लोकांजवळ जाऊन केली. मात्र आम्हाला तुम्ही गप्प करू नका बोलू द्या, अशीच भूमिका या लोकांची होती. आमदारा समवेत गावातील काही ग्रामस्थांनी खासदारांना सवाल करणार्‍या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु हे ग्रामस्थ संतप्त झाले होते. निवडणुकीत शेतीसाठी प्राधान्याने पाणी देतो असे तुम्ही म्हटले होते त्याचं काय झालं? आम्ही तुम्हाला मतदान केले आहे आम्हाला बोलू द्या, अशी मागणी केली.
आता मी तुमच ऐकून घेतल आहे..शांत रहा.. मला बोलू द्या, तुम्ही शांत नाही राहिले तर मी कसं बोलू शकेल, असे म्हणून खासदार विखे यांनी भालगाव व परिसरात झालेल्या विकासकामांचा पाढा लोकांसमोर वाचला. विखे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचा कालावधी पाणी योजनेचे काम मंजूर करून दिल्या जात नव्हतं, आपलं सरकार आल्यानंतर काम मंजूर झाले. पिण्याच्या पाणी योजनेचे कामाला सुरुवात झाली असून, येत्या सहा महिन्यात तुम्हाला पाणी मिळेल, असा मी तुम्हाला असा शब्द देतो. मी खासदार म्हणून काय विकास केला या प्रश्नाला विखे यांनी उत्तर देऊन विकास कामांची यादी वाचली. गावांतर्गत असलेले तुमचे वाद-विवाद हे गावाच्या विकासाच्या प्रश्नावर आणू नका, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे असतात, त्यामुळे वादविवाद घालण्या पेक्षा महिला भगिनी आले आहेत. त्यांना या श्रीरामाच्या प्रसादाचा लाभ घेऊ द्या. आपला वाद विवाद चालूच राहील असे शेवटी विखे म्हणत विखेंनी कार्यक्रम आटोपता घेत कार्यक्रमाची सांगता केली.


भालगाव हे गाव भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांचे असून, या ठिकाणी त्यांना कडवा विरोध होत आहे. याच गावातील अनेक पुढारी तालुका व गाव पातळीवर राजकारणात सक्रिय आहे. काही भाजपचे व आमदार राजळे यांचे कट्टर समर्थक असून, यांचा कायम कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून खेडकर यांच्याशी संघर्ष सुरू असतो. मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या भालगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत हा संघर्षही पाहायला मिळाला. त्या संघर्षाची ठिणगी या कार्यक्रमात पडल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!