विवेकानंदांच्या जयघोषात दोन लाख भाविकांनी घेतला महाप्रसाद!
– तब्बल ५९ वर्षांच्या परपरेंचा जगाने अनुभवला अद्भूत सोहळा!
हिवरा आश्रम, जि. बुलढाणा (संतोष थोरहाते) – युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या नावाने जगात एकमेव साजरा होणार्या तीन दिवशीय उत्साहवर्धक अध्यात्मिक सोहळ्याची तब्बल दोन लाख भाविकांच्या महाप्रसाद पंगतीने आज (दि.२) उत्साहात सांगता झाली. हा महाप्रसाद घेण्यापूर्वी लाखो भाविकांच्या मुखातून निघालेल्या स्वामी विवेकानंद की जय… भारत माता की जय… पू. शुकदास महाराज की जय.. या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. तब्बल ५९ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या या जन्मोत्सव सोहळ्याची शुक्रवारी दुपारी पाच वाजेच्या जनता जनार्धनाच्या विराट स्वरूपदर्शनाने अद्भूत सांगता झाली.
‘आरती करू ब्रम्हरूपाला..’ या प.पू.शुकदास महाराजांच्या आरतीनंतर बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार डॉ.संजय रायमूलकर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पाटील यांच्या उपस्थित महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महापंगतीने सामूहिक महाप्रसाद सेवनाचा लाभ घेणार्या भाविकांच्या गर्दीचा स्वतःचाच विक्रम मोडित काढला. सामूहिक शिस्तीची भक्ती दाखवित ४० एकराच्या परिसरात एकाचवेळी ५३ पंगती बसल्या होत्या. तब्बल १०१ ट्रॅक्टरद्वारे व तीन हजार स्वयंसेवकांनी महाप्रसाद वितरणात सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे, कोणतीही अस्वच्छता न करता ही महापंगत उठली. सर्व भाविकांचे विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कुंकूम-चंदन तिलक लावून, धूप आरती ओवाळून पूजन केले. यावेळी सभापती माधवराव जाधव, आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, आश्रमाचे पदाधिकारी, समता परिषदेचे दत्ता खरात, काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवदास रिंढे, संपतराव देशमुख, उद्योजक एकनाथ दुधे, पत्रकार सिध्देश्वर पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय वडतकर, सुरेशआप्पा खबुतरे, सरपंच मनोहर गिर्हे, प्रमोद रायमूलकर, कमलाकर गवई, पत्रकार समाधान म्हस्के पाटील, संतोष थोरहाते, सदाशिव काळे, ओमप्रकाश देवकर, भरत सारडा, मनिष मांडवगडे, शिवप्रसाद थुट्टे, प्राचार्य आर.डी.पवार, डॉ.सुभाष कालवे, मंगेश जकाते तथा आदिंची उपस्थिती होती.
महाप्रसाद स्थळावरील मनोर्यावरुन वेदान्ताचार्य, महानतपस्वी गजाननदादा शास्त्री यांचे बहारदार सूत्रसंचलन व विराट समुहाला मार्गदर्शन सुरु होते. त्यांनी शंखध्वनीसह केलेल्या स्वामी विवेकानंद व पू. शुकदास महाराज यांच्या जयनाम घोषाने आसमंत अक्षरशः निनादून गेला होता. शिस्तबद्धपणे या लक्षावधी भाविकांनी भावपूर्ण वातावरणात हा महाप्रसाद सेवन केला. विवेकानंद आश्रमाचे आजी-माजी विश्वस्त, पदाधिकारी यांनी सोहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार स्वप्नील नाईक व त्यांच्या सहकार्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.