– धुव्वाधार पावसाने मिसाळवाडी धरण भरले
– नदी-नाल्यांना पूर, शेतीपिके पाण्याखाली
मिसाळवाडी फाट्यावर विद्यार्थी, गावकरी अडकले
मिसाळवाडी नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला असून, देऊळगाव घुबे येथे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी गावाच्या फाट्यावर अडकून पडले आहेत. गावात जाणार्या पुलावरून पाणी वाहात असून, नदीला पूर आलेला आहे. पुलाचे पाणी ओसरले नाही तर या मुला-मुलींसह गावातील ग्रामस्थांना आजची रात्र फाट्यावरच अंधारात काढावी लागणार आहे. दरम्यान, नजीकच्या शेळगाव आटोळ येथील ग्रामस्थांनी या मुला-मुलींसाठी व अडकून पडलेल्या ग्रामस्थांसाठी जेवण व पाणी थोड्या वेळापूर्वीच पाठवले होते. मुलांसह काही महिला व ग्रामस्थ मिसाळवाडी फाट्यावर अडकून पडलेले आहेत. ते सर्व सुखरूप असल्याचे सांगण्यात आले असून, अंढेरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचण्याची गरज आहे.
चिखली/देऊळगावराजा (तालुका प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील मिसाळवाडी-पिंपळवाडी, शेळगाव आटोळ परिसरात आज दुपारी दोन ते सहा वाजेच्या सुमारास ढगफुटीसदृश धुव्वाधार पाऊस झाला. या पावसाने मिसाळवाडी नदीला महापूर आला असून, मिसाळवाडी धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहात आहे. या पावसामुळे शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले असून, अनेक शेतात पाणी साचल्याने पिके वाया गेली आहेत. त्यामुळे अतिवृष्टीने पीडित या शेतकर्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांनी केली आहे.
दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास धुव्वाधार सुरु झालेल्या या पावसाने मिसाळवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नदीला पूर आला असून, नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मिसाळवाडी गावाचा संपर्क तुटला होता. तर अनेक शेतकरी शेतात-रानात अडकून पडले आहेत. या पावसाने जीवितहानी झाली नसली तरी, शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतात उभे असलेले सोयाबीन व इतर पिकांची नासाडी झाली असून, शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सायंकाळीही पावसाची संततधार सुरुच होती. ढग फुटावा तसा पाऊस कोसळत होता, त्यामुळे बरेच वर्षानंतर मुसळधार पाऊस पाहिला, असा अनुभव वयोवृद्ध शेतकर्यांनी व्यक्त केला आहे. मिसाळवाडी धरण भरल्याने सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
वीज पडून शेतकरी महिला जागीच ठार, पती गंभीर
सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव येथे शेतात काम करत असलेल्या शेतकरी महिलेच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. रुख्मिणीबाई गजानन नागरे (वय ५०) असे त्यांचे नाव आहे, तर त्यांचे पती गजानन संपत नागरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावाच्या जवळ असलेल्या शेतात हे पती-पत्नी काम करत होते. विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाल्याने या दोघांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. दुपारी अडिच वाजेच्या सुमारास हे दोघे झाडाखाली बसलेले असताना, झाडावर मोठा आवाज करत वीज कोसळली. त्यात रुख्मिणीबाई या जागीच ठार झाल्या, तर गजानन नागरे हे गंभीर जखमी झालेत. त्यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी जालना येथे हलवले. त्यांची प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले. मंडळ अधिकारी रवींद्र घुगे, ग्रामसेवक अविनाश नागरे, तलाठी वाय. एच. घरजाळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेने हळहळ व्यक्त होत होती.