Aalandi

आळंदीतील फुटपाथ झाले अतिक्रमणमुक्त!

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषद,  आळंदी पोलीस स्टेशन,  दिघी आळंदी वाहतूक पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई करत, आळंदी शहर अतिक्रमणमुक्त केले व शहरातील फूटपाथ माेकळे केले. सलग पाच तास ही कारवाई सुरु हाेती.  या कारवाईबद्दल आळंदीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

भैरवनाथ चौक,  वडगाव रस्ता,  मरकळ रस्ता,  प्रदक्षिणा रस्ता आदी ठिकाणी फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून कारवाई करण्यात आली. फुटपाथवरील दुकाने रहदारीला अडथळा करणारी असल्याने सर्व अतिक्रमणे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचे नियंत्रणात व मार्गदर्शनात करण्यात आली. गेल्या आठवड्यात आठ दिवसात दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने नागरिक,  भाविक यांच्यात नाराजी होती.  मुख्य रहदारीचे ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी व परवानगी पोलिस प्रशासनाकडे करून परवानगी मिळाली असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.

नागरिकांनी व विविध पक्ष संघटनांनी गतिरोधक बसवावेत अशी मागणी केली होती.  त्या प्रमाणे आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी गतिरोधक बसविण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याचे सांगितले.  नियमित अतिक्रमणे हटाव मोहीम राबविली जाणार असल्याने कोणीही फुटपाथवर रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.  अतिक्रमणे करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. उर्वरित अतिक्रमणे येत्या आठ दिवसात काढण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. कारवाईत आळंदी नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख, अधिकारी, पोलीस अधिकारी, कंत्राटी कामगार, जेसीबी, दोन ट्रॅक्टर, दहा पोलीस कर्मचारी असा मोठा ताफा तैनात होता.  उद्या प्रदक्षिणा मार्ग, माऊली मंदिर परिसर, देहु फाटा , केळगाव रोड बाह्यवळण मार्ग या ठिकाणी अतिक्रमणविराेधी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस नाईक मचिन्द्र शेंडे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, विभाग प्रमुख किशोर तरकासे, सचिन गायकवाड, मिथिल पाटील, अरुण घुंडरे आदींनी भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!