Uncategorized

टोचावं लागतं… !

तसं मला अगदी माणूस गेला तरी रडू वगैरे येत नाही पण पुस्तक वाचताना, सिनेमा बघताना कधीही येतं. ‘आनंद’, ‘श्यामची आई’, ‘दो बिघा जमीन’ बघताना आवंढा येतोच, डोळेही पाणावतात. ‘शोले’, ‘मेरा नाम जोकर’ बघताना आता फार तर आवंढा येतो पण रडू नाही येत कारण तो अनंतवेळा बघून झालाय. यातलं कुणी आपल्या नात्यागोत्याचं अजिबात नाही. कुणी दिग्गज माणूस गेला की लोक रडतात. कॅमेरासमोर रडणारे खरे कुठले आणि खोटे कुठले कळणं अवघड. आधी या प्रकाराची मी चेष्टा करायचो. खरंतर उमाळा आतून आला की त्याचा खरेखोटेपणा तपासू नये पण एकूणच शो करण्याची प्रवृत्ती बळावल्यामुळे असं ग्लिसरीन रडणं पुढे आलं असावं.

२ जून ८८ ला राजकपूर गेला तेंव्हाची गोष्ट. नुकताच सुधारण्याकरता मला बदलापूरला पाठवण्यात आलं होतं. धनाचा मामा समोरच रहायचा. आरके गेल्याच्या बातम्या चालू होत्या. तेंव्हा भंकस ब्रेकिंग न्यूजचा प्रकार नव्हता. त्याची एकेक गाणी दाखवत होते. आम्ही सगळे चिडीचूप गाणी बघत बसलो होतो. शेवटचं गाणं ६७ च्या ‘दिवाना’ मधलं ‘हम तो जाते अपने गांव’ लागलं. सायराबानूसमोर गाणं म्हणणारा, फक्त दिसायला भाबडा असणारा राज कपूर गात होता. आधीच मुकेशचा आवाज म्हणजे डोळ्यात पाणी यायची ग्यारंटी. आमचा बाळूमामा तो पर्यंत निःशब्द सगळं बघत होता पण ते शेवटचं ‘हुई हो भूल कोई तो, उसे दिल से भुला देना, कोई दीवाना था, बातों पे उसकी ध्यान क्या देना’ ऐकलं आणि तो हमसाहमशी रडू लागला. श्वास कोंडतो की काय आता याचा अशी भीती वाटायला लागली सगळ्यांना. पण त्या ओळी, मुकेशचा करुण आवाज, ती चाल आणि ती बातमी याचा एकत्रित परिणाम असेल पण त्याला अश्रू आवरेनात. मलाही रडू आलं. त्यावेळी समजलं मला, कलाकार आपल्याला इतकं देत असतो की ती कृतज्ञता अशी व्यक्त होते. घरातलं माणूस गेल्यासारखं रडू यायला तेवढं आत टोचावं लागतं काहीतरी.

पुलं. त्यांची पुस्तकं वाचताना अनंत आवंढे आलेत, दरदरून हसू पण आलंय. अजूनही त्यांच्या आवाजात अंतूबर्वा, हरितात्या, चितळे मास्तर, नारायण ऐकले की काही वाक्यांना श्वास घुसमटतो. काय जादू होती या माणसात कळत नाही. हा माणूस अजिबात बनेल नव्हता, त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नव्हता, लाचार नव्हता, यशासाठी तडजोडी करणारा नव्हता, ‘गुळाचा गणपती’ फुकट करून घेतला म्हणून रडगाणं गाणारा नव्हता, अडचणी सांगून पैसे गोळा करणारा नव्हता. माणसांचा, सुरांचा, मांगल्याचा लोभी होता. दाद देणारा होता, विनोदाचे अत्तरसडे टाकणारा होता. प्रतिभा असली तरी आनंद देण्याची वृत्ती हवी. ज्या क्षेत्रात ते गेले तिथे ठसा उमटवून मग पुढे गेले. आत्मा जसा शरीर बदलतो तसे ते नवी वस्त्र घालताना मागच्या यशाचा अहंकार तिथेच टाकून पुढे आले. पुलंच्या वक्तव्यात कुठेही हे मी केलं हा प्रकार नाही. जे चांगलं दिसलं ते उचलून धरायचं याला मोठं मन लागतं. समाजानी दिलेलं समाजाला परत देण्याची संतवृत्ती असलेला माणूस. पै पैचा, खोट्या मानापमानाचा निरर्थक हिशोब ठेवणारे आपण, अशी माणसं पाहिली की लाज वाटून जाते.

पुलं गेले तेंव्हा कामावर होतो. जेवायला घरी आलो तेंव्हा अंत्ययात्रा दाखवत होते टीव्हीला. बायको शेजारीच बसली होती. अचानक हुंदका फुटला, हमसाहमशी रडू आलं. तिला काहीच कळेना. मला बाळूमामा आठवला. म्हटलं ना टोचावं लागतं आत कुठेतरी. ज्यानी आमचं आयुष्य समृद्ध केलं तो निर्विष विनोद त्या दिवशी नवीन क्षेत्रात मुशाफिरी करायला निघून गेला. जगरहाटी चालूच राहील. इथे अनंत आले नी गेले, कुणी हिशोब ठेवलाय. पण जोवर माणसं आहेत, त्यांना भावना आहेत, त्यांना हसू येतंय तोवर अत्रे, चिंवी जोशी, गडकरी, पुलं, वुडहाऊस, ट्वेन कुठे ना कुठे जन्मत रहातील. आत्मे तेच, शरीरं वेगळी फक्त.

नात्यातली, जीवाभावाची सोडली तर गेली म्हणून रडू येईल अशी माणसंही आता मोजकी राहिलीयेत. आपल्यासाठी कुणी रडेल न रडेल पण अशा राहिलेल्या मोजक्या माणसांसाठी रडू आलं की कृतज्ञता पोचली म्हणायचं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!