– पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकर्यांची शिंदे-फडणवीस सरकारकडे आर्त विनवणी
पालघर (विजय पटेल) – राज्यात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने गणपती सणापूर्वी पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकर्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदान (बोनस) जमा करावा, अशी मागणी जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी करत आहेत. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकात्मिक आधारभूत भात खरेदी केंद्रांवर भात देऊन आजरोजी आठ महिने लोटले आहेत. आजपर्यंत केवळ आधारभूत किंमत तेवढी शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. परंतु, शेतकरी प्रोत्साहन अनुदान जे ७०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे जमा होणे गरजेचे आहे, ते झाले नाही. तेव्हा शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने अनुदान जमा करावे, शेतकरी चातकाप्रमाणे या अनुदानाची प्रतीक्षा करत आहे.
पालघर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात भात पिकांची लागवड करत असतो. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल लोकसंख्या असलेला जिल्हा असून, खाजगी व्यापारी व सावकारांकडून शेतकर्यांची लूट व फसवणूक होऊ नये, या उदात्त हेतूने शासनाने पालघर जिल्ह्यात एकात्मिक व आधारभूत भात खरेदी योजना लागू केली होती. वर्ष २०१९-२०२० साली केंद्र व राज्य सरकारने मिळून भातपिकाला प्रति क्विंटल १८५० रुपये आधारभूत भाव व प्रति क्विंटल ५०० रुपये प्रोत्साहन अनुदान (बोनस) शेतकर्यांच्या खात्यात थेट जमा केले होते. मागील वर्षांच्या खरीप हंगामात शेतकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले होते. निसर्गाने चांगल्या प्रकारे साथ दिल्याने शेतकरी सुखावला होता व मोठ्या प्रमाणात उत्पादित झालेले भात शेतकर्यांनी शासनाने निर्माण केलेल्या धान्य खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करून विकण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षी शेतकर्यांना १८५० अधिक ५०० रुपये असे २३५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता.
वर्ष २०२०-२०२१ च्या खरीप हंगामात मागील वर्षांचा चांगला भाव व बोनस मिळाल्याने शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड केली होती. पण निसर्गाचा प्रकोप, ताप्तीसारखी वादळे व ऐन कापणीच्या व झोडणीच्या मोसमात अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला व एकरी सरासरी येणारे उत्पादन १५०० ते २००० किलो येणारा उत्पादन (उतारा) १००० ते १२००किलो वर आला. सन २०२०-२०२१ या हंगामात हमीभूत आधार भाव सरकारने १९४० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात शेतकरी सुखावला, कारण या हंगामात शेतकर्यांना महाविकास आघाडी व केंद्र सरकारकडून प्रोत्साहन अनुदान ७०० रुपये प्रतिक्विंटल मिळेल, अशी आशा शेतकरी उराशी बाळगून होता. शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी करून एकात्मिक भात खरेदी केंद्रावर भातपिक नेऊन दिले. एकात्मिक आधारभूत भात खरेदी केंद्रावर भात देऊन आजमितीस ८ महिने उलटून गेले असून, शेतकर्यांच्या खात्यावर फक्त आधारभूत किंमतीचे पैसे जमा झालेले आहेत. परंतु, शेतकरी प्रोत्साहन अनुदान ७०० रुपये प्रतिक्विंटल हे अद्याप खात्यात जमा झालेले नाही. ते कधी जमा होणार, याची शेतकरी चातकाप्रमाणे आशेने वाट पाहात आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त राज्य करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी गणपती सणापूर्वी हे बोनस अनुदान तातडीने भात उत्पादक शेतकर्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी पालघर जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. आगामी सणसूद ही शेतकरीवर्गाची अडचण लक्षात घेऊन, प्रलंबित असलेले ७०० रुपये प्रतिक्विंटल प्रोत्साहन अनुदान (बोनस) गणपती सणापूर्वी शेतकर्यांच्या खात्यात जमा करावे, अशी सार्थ मागणी व आशा शिंदे-फडणवीस सरकारकडे हे शेतकरी व्यक्त करत आहेत.