शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह परिसरातील गावांत दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असून, गावपरिसर प्रचंड दहशतीत आहेत. बोधेगाव येथे स्वतंत्र पोलिस ठाणे देण्यात यावे, व चोरटे-दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा, यासह इतर महत्वपूर्ण मागण्यांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांच्यासह भाजपचे अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष भगवान मिसाळ यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. विविध गावांतून या आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहाता, शेवगावचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी फौजफाट्यासह तातडीने भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली, व हा प्रश्न वरिष्ठांकडे पाठवला जाईल. चोरट्यांचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा दिला जाईल, आदी आश्वासने दिल्याने हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे.
शेवगाव तालुक्याच्या पूर्व बोधेगांव परिसरातील चोरट्यांची दहशत कायम असून, गेल्या १५ दिवसापासून भागातील वाड्या वस्त्यांवर चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच आहे. आघाव वस्तीवर दरोडेखोरांच्या मारहाणीत पती, पत्नी गंभीर जखमी झाले आहेत, ते अजुनही दवाखान्यात उपचार घेत असून, संपूर्ण आघाव कुटुंब भयभीत आहे. गमे वस्ती, ढाकणे वस्ती, आदी वाडीवस्ती तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक बी रामानंद असतांना मुरमीला दरोडा पडला होता, दरोडेखोरांनी महिलेला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले होते. या सर्व घटनेचा तपास लावण्यास पोलीसांना आजपर्यंत यश आलेले नाही. या घटनेपासून परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी भयभीत झाले आहेत. परिसरात रात्रीचे ड्रोन फिरत आहेत, नागरिक रात्र जागून काढतात. चोरट्यांचा कायम बंदोबस्त करून बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे. बोधेगाव, मुंगी, कांबी, हातगांव, लाडजळगांव ही मोठी लोकसंख्येची गावे आहेत. यासह गोळेगांव, नागलवाडी, राणेगांव, शेकटे, दोन्ही अंतरवाली, सोनविहीर, पिंगेवाडी, शेकटे, खामपिंप्री, अधोडी, इत्यादी ३२ गावे बोधेगांवपासून २ ते १० किलोमीटर अंतरावर आहेत. लगतच मराठवाड्याची हद्द असून, गुन्हेगारांचा मोठा वावर आहे. तसेच नाकाबंदी बंद आहे, बोधेगांव पोलीस दुरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येतात. येथे पोलीस उपनिरिक्षक आणि सहा कर्मचार्यांची नेमणूक आहे. पण आणीबाणीच्या वेळी कुणीच हजर नसते. गेल्या सुमारे २५ वर्षापूर्वी बोधेगांवला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव त्यावेळच्या पोलीस अधीक्षकांनी नाशिक विभागीय परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षकांना सादर केला होता. त्यांनी प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठवला होता. पोलीस महासंचालकांनी बोधेगांवला स्वतंत्र पोलीस ठाणे मंजुरीसाठी राज्याच्या गृह मंत्रालयालयाकडे पाठवला. तेव्हापासून हा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडला आहे.
बोधेगाव नंतर जिल्ह्यातील बेलवंडी, सोनई, घारगाव, पोलीस ठाण्याचे प्रस्ताव मार्गी लागले आहेत. बोधेगाव परिसरात दरोडे, चोर्यामार्या किंवा मोठी गुन्हेगारीच्या घटना घडल्यावर स्वतंत्र पोसीस ठाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे चोरट्यांच्या दहशतीतुन परिसर भयमुक्त करून स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करा, आदी प्रमुख मागणीसाठी बुधवारी (दि.२८) बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रावर माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांच्यासह भाजपाचे अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष भगवान मिसाळ, कासम शेख, भारत घोरपडे, महादेव घोरतळे, युंनुस पटेल, विजय कानडे, महेश घोरतळे, गोकुळ घोरतळे, संजय पोटभरे, रज्जाक भाई पठाण, समीर बागवान, गणेश अधापुरे यांनी उपोषण पुकारले होते. यावेळी यांच्यासह ग्रामस्थ व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेवून चर्चा करून पुकारलेले उपोषण मागे घेण्यात आले.