‘जीआर’ निघण्याआधीच शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारे इसरूळ ठरले राज्यातील पहिलेच गाव!
– ठाणेदार विकास पाटील यांच्याकडून शाळेतील कॅमेर्यांची पाहणी, शिक्षकांना दिल्या सूचना
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील इसरूळ या गावाच्या जिल्हा परिषद शाळेसह संपूर्ण शाळा परिसर गावाचे दूरदृष्टी लाभलेले विकासाभिमुख नेतृत्व सतिश पाटील भुतेकर यांनी सीसीटीव्ही कॅमेर्याच्या निगरानीखाली आणून, विद्यार्थिनी सुरक्षित केल्या आहेत. राज्य सरकारने नुकताच शासन आदेश काढून शाळा परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, तत्पूर्वीच इसरूळची शाळा ही सीसीटीव्हीच्या निगरानीत आणली गेली असल्याने राज्यातील ती पहिली सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारी शाळा ठरली आहे. सरपंच व त्यांच्या सहकार्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे जिल्हाभरातून जोरदार कौतुक होत आहे.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील इसरुळ गावाचे नाव वेगवेगळ्या कारणाने बुलढाणा जिल्हाभर नेहमी चर्चेत असते. खडकपूर्णा प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेले चिखली तालुक्यातील हे एकमेव व शेवटचे गाव आहे. याच गावातून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले व चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष असलेले सतिश पाटील यांनी गावाच्या विकासासाठी व सुरक्षितेसाठी १५ ऑगस्ट २०२४ ला ग्रामपंचायतीच्यावतीने महत्त्वाचा असा निर्णय घेत, गावातील मराठी पूर्व माध्यमिक जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक वर्ग व परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, संभाजीराजे चौक (बस स्टँड परिसर), आणि ग्रामपंचायत भवन व परिसर अशा महत्त्वाच्या पाच ठिकाणी उच्चप्रतीचे नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याची पाहणी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी नुकतीच शाळेला भेट देऊन केली व शिक्षकांना आवश्यक सूचना केल्यात. तसेच सरपंच सतिश पाटील यांच्या या कार्याचे कौतुकदेखील केले.
यावेळी सरपंच सतीश पाटील, उपसरपंच सौ. रामकोर काळे, ग्रा.पं.सदस्य तथा पत्रकार भिकनराव भुतेकर, सौ. किरणताई भुतेकर, सौ. निर्मलाताई काकडे, यासह इतर ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक गजानन वायाळ व ग्रामस्थ उपस्थित होते. बदलापूर येथील मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेनंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपायोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत नुकताच महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत दिनांक १८ ऑगस्टला शासन निर्णय आलेला आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णयाची काटेकोरपणे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांचा सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाबीची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात घेत आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या शासन निर्णयामध्ये शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, तक्रारपेटी, सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदीचे अनुपालन, शाळा व परिसरात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्चचार्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा करता व शासन निर्णयाच्या दिनांक पासून एक महिना कालावधीत शाळा व या तरतुदीचे पालन न करणार्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल. यामध्ये प्रसंगपरत्वे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेचे मान्यता रद्द करण्यात देखील अवलंब करण्यात येईल. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत, अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसण्याबाबत कारवाई करावी. परिसरातील मुख्य ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहणार आहे, असे स्पष्ट आदेश आहेत. दरम्यान, शासनाचा हा आदेश जारी होण्यापूर्वीच इसरूळचे दूरदृष्टीकोन असलेले कर्तव्यदक्ष सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी आपले गाव सीसीटीव्हीच्या निगरानीत आणले आहे. तसेच, शाळा व शाळा परिसरदेखील चोवीस तास सीसीटीव्हीच्या निगरानीत आणल्याने येथील विद्यार्थी सुरक्षित झालेल्या आहेत. सरपंच सतिश पाटील व त्यांच्या सहकार्यांचे ठाणेदार विकास पाटील यांनी कौतुक करत, या कामाची पाहणीदेखील केली.
सीसीटीव्ही कॅमेर्यामुळेच सतिश पाटलांचे राजकीय विरोधकही बचावले?
इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांचे राजकीय विरोधक असलेले संतोष पाटील भुतेकर यांनादेखील गावात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचा मोठा फायदा झाला असून, तेदेखील एका मोठ्या षडयंत्रातून बचावले आहेत. एका वाळूतस्कराने संतोष पाटील भुतेकर यांना अडकविण्यासाठी स्वतःच टिप्पर पेटवून दिला होता. संतोष पाटील व त्यांच्या सहकार्यांवर आळ घेण्याचा त्याचा डाव होता. परंतु, सीसीटीव्हीत टिप्पर पेटविण्याचे सर्व चित्रीकरण झाल्याने व ते ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’सह सर्व प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देण्यात आल्याने त्या वाळूतस्कराचा डाव फसला, व संतोष पाटील भुतेकर हे एका मोठ्या षडयंत्रातून बचावले होते. त्यामुळे सतिष पाटील भुतेकर यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यामुळे त्यांच्या राजकीय विरोधकांनादेखील फायदा झाल्याची चर्चा परिसरात सातत्याने होत आहे.