सिंदखेडराजा (उषा डोंगरे) – सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात गो-धन चोरीस जाऊ लागले असून, त्यामुळे शेतकरी धास्तावलेले आहेत. देऊळगावराजा शहरालगत गुगळादेवी मंदिर परिसरातील गिरोली रोडवरील श्रीकृष्ण गोसंवर्धन ट्रस्ट द्वारा संचालित गोशाळेमधील सात गाई व एक वळू शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे.
देऊळगावराजा येथील श्रीकृष्ण गोशाळा गुगळादेवी मंदिर परिसर येथे दिनांक २७ जुलै, शनिवारच्या रात्री ते दि २८ जुलै सकाळी ६ वाजेदरम्यान अंधाराचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी तारचे वॉल कंपाऊंड तोडून गोशाळेत प्रवेश केला व गोशाळेमधील सात गायी आणि एक वळू चोरून नेले. ही घटना दिनांक २८ जुलै रोजी सकाळी सात वाजता गोशाळेमधील रखवालदार यांच्या लक्षात आली. त्यांनी या संदर्भात गोशाळेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांना माहिती दिली. संचालक मंडळ यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली व देऊळगावराजा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांची भेट घेऊन गोधन चोरीसंदर्भात माहिती दिली. दि २८ जुलैला रात्री रीतसर पोलीस स्टेशनला रखवालदार गणेश विष्णू शिन्दे यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक तपास करीत आहे. यावेळी गोसंवर्धन शाळेचे अध्यक्ष राजेश तायडे, संचालक भरत कुन्हे, आदर्श गुप्ता, अविनाश भावसार, किशोर पटेल, गणेश मीनासे, अर्पीत मिनासे या संचालकांसह पत्रकार सुरज गुप्ता, सुनिल काटकर, राजू देशपांडे आदींची उपस्थिती होती.