प्रलंबित पीकविमा, नुकसान भरपाई व शेतकर्यांच्या मागण्यांसाठी विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांचा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा
– भक्ती महामार्ग व कामगारांच्या प्रश्नावरही लढा उभारणार – सरनाईक, राजपूत
चिखली (महेंद्र हिवाळे) – गेल्या वर्षीचा प्रलंबित पीकविमा, नुकसान भरपाई तसेच भक्ती महामार्ग रद्द करा, तालुक्यातील रखडलेले विहिरींच्या प्रस्तावांना मान्यता मिळावी, यासह शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. ४ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास चिखली तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात सरनाईक व राजपूत यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीने खरीप व रब्बी हंगामात शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे. नवीन खरीप हंगाम आला तरीसुद्धा पीकविमा कंपनी अजून पीकविमा दिला नाही, ज्यांना दिला त्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम दिली तर तालुक्यातील रब्बीतील ८ हजार तर खरीप मधील हजारो शेतकर्यांना विविध कारणे दाखवत अपात्र केले आहे. एकीकडे नुकसान भरपाई शासन देत आहे. परंतु दुसरीकडे मात्र ७२तासात तक्रार न केलेल्यांना पीकविमा देण्यास कंपनी टाळटाळ करीत असल्याने सरसगट १०० टक्के पीकविमा रक्कम देण्यात यावी, ऑनलाइन प्रणालीमुळे ई-केवायसी करूनसुद्धा हरभर्याची नुकसान भरपाई अडकून पडली आहे. त्यामुळे तातडीने पीकविमा व नुकसान भरपाई देण्याची मागणी सरनाईक व राजपूत यांनी केली आहे. शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्याची व मागील रखडलेले ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे भक्ती महामार्गाला शेतकर्यांचा तीव्र विरोध असतांना भक्ती महामार्गा करण्याचा घाट का घातला जात आहे? शेतकर्यांना नोटीस दिल्या जात आहे. सरकारला शेतकर्यांच्या रक्ताचा नैवेद्य हवा आहे का..? असा प्रश्न उपस्थित करत तातडीने भक्ती महामार्ग रद्द करावा, अशी मागणी सरनाईक, राजपूत यांनी केली आहे. त्यासोबत चिखली तालुक्यात रोजगार हमी योजनेचे विहरींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्या भ्रष्टाचाराची जलगतीने चौकशी करून तातडीने खरखडलेल्या विहीर, गोठे, घरकुलाचे प्रस्ताव मंजूर करण्यार यावे, तसेच चिखली शहरा लगतची १६ गावे महावितरणे उंद्री (उदयनगर) विभागात समाविष्ट केल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे, गावाचे सरपंच व नागरिकांनी वारंवार मागणी करूनही महावितरण कार्यवाही करत नाही, त्यामुळे तातडीने ही १६ गावे पूर्वीप्रमाणे चिखली विभागात समाविष्ट करण्यात यावी. तर कामगार कल्याणच्या माध्यमातून राबविलेल्या जाणार्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, कामगारांची मोठी आर्थिक लूट होत आहे. इतर तालुक्यात संसार किट वाटप झालेल्या असतांना चिखली तालुक्यात मात्र कामगार कल्याणच्या व संबंधित संस्थेच्या वेळ काढू धोरणामुळे अनेक कामगारांची नूतनीकरण तारीख संपली आहे व नूतनीकरणासाठी वेळ लागत असल्याने हजारो कामगार योजनेपासून वंचित राहणार. त्यामुळे तातडीने वंचित कामगारांना योजनेचे लाभ देण्यात यावा, भ्रष्ट व दोषी कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी, यासह विविध मागण्या विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी केल्या आहेत. जर सरकार व प्रशासनाने ४ ऑगस्टपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर ५ ऑगस्टपासून चिखली तहसील समोर शेतकर्यांसमवेत बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी दिला आहे.
आ. श्वेताताई महाले यांच्या पोलिस बॉडीगार्डची गोळी झाडून घेत आत्महत्या