ChikhaliHead linesVidharbha

आ. श्वेताताई महाले यांच्या पोलिस बॉडीगार्डची गोळी झाडून घेत आत्महत्या

UPDATE

कौटुंबीक कलह व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या!

पोलिस कॉन्स्टेबल अजय गिरी यांची मुंबईहून बुलढाणा पोलिस दलात बदली झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आमदार श्वेताताई महाले यांच्या सशस्त्र सुरक्षा रक्षणात कार्यरत होते. बुधवारी सायंकाळी त्यांनी आपल्या सर्विस गनमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळीबारचा आवाज ऐकून पोलिस वसाहतीतील फ्लॅटमधील शेजारी व नातेवाईक धावून गेले. त्यांना तातडीने शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील व बुलढाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे हे धावून गेले. तसेच शासकीय रूग्णालयातही हे अधिकारी तातडीने पोहोचले. बुलढाण्याचे प्रभारी पोलिस अधीक्षक बी बी महामुनी यांनी सांगितले, की प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबीक कलह आणि आर्थिक विवंचनेतून गिरी यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती मिळत आहे. पुढील तपास शहर पोलिस करत आहेत. घटनास्थळाहून त्यांनी गन जप्त करण्यात आली आहे.


दरम्यान, आमदार श्वेताताई महाले यांनी सांगितले, की अजय गिरी हे माझ्याकडे येईपर्यंत मुंबई पोलिसमध्ये कार्यरत होते. ते चिखली शहरातच लहानचे मोठे झाले असून, माझ्यासाठी कुटुंबातील सदस्याप्रमाणे होते. चिखली शहरातील पुंडलीकनगर गजानन नगर परिसरातील ते रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबात काही कलह होते. त्यांना आम्ही आधार देत होतो. आचारसंहिता काळात ते आमच्याकडे नव्हते, तेव्हादेखील त्यांनी असे काही करण्याचा प्रयत्न केला होता, असे कानावर आले होते. काल संध्याकाळी ते सोबत होते. परंतु, ते असे टोकाचे पाऊल उचलतील, असे वाटले नाही.


दरम्यान, अजय गिरी यांच्या पत्नी दीपाली यादेखील घरीच होत्या. त्यांच्या समोरच अजय यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली. याबाबतचा घटनाक्रम त्यांनी सांगितला. अजय गिरी यांच्या वहिनीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात त्यांचे भाऊ तुरूंगात आहेत, त्यामुळे ते प्रचंड व्यथित होते. त्यातच त्यांच्यावर काही बँकांचे कर्ज होते, व बँकवाले त्यांना परेशान करत होते. आजदेखील चार वाजेच्या सुमारास त्यांना बँकांचे फोन आले होते, त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले होते. पत्नी दीपाली यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्नही केला. परंतु, त्यांनी झटक्यात गन उचलून डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी आरपार गेल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पत्नी दीपाली व मुलगा प्रथमेश हे आरडाओरड करत असल्याचे पाहून शेजारी धावून आले. पण तोपर्यंत सर्व संपले होते. अजय गिरी यांचा प्रथमेश हा मुलगा फक्त ८ वर्षांचा आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार श्वेताताई महाले यांनी त्यांच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. पोलिसांनी पंचनामा करून आत्महत्येसाठी वापरलेली गन, डोक्यातून आरपार गेलेली बंदुकीची गोळी ताब्यात घेतली आहे.


– शासकीय बंदुकीतून स्वतःवरच झाडली गोळी, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – चिखलीच्या आमदार तथा भाजपच्या नेत्या श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांना देण्यात आलेल्या शासकीय सुरक्षा रक्षकाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी डोक्यात शासकीय बंदुकीतून गोळी झाडून घेतली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण मात्र समजू शकले नाही. अजय गिरी असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून, रक्ताच्या थारोळ्यात त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, गिरी यांची आज साप्ताहिक सुट्टी असल्याने ते आमदार निवास किंवा कार्यालयात गेले नव्हते.
advt.

आमदार श्वेताताई महाले यांनी राज्य सरकारने सशस्त्र सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे. पोलिस कॉन्स्टेबल अजय गिरी हे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत होते. आज त्यांनी अचानक त्यांच्या बुलढाणा येथील पोलिस वसाहतीत असलेल्या निवासस्थानी स्वतःवर शासकीय बंदुकीतून गोळी झाडून घेतली. ही घटना शेजारच्यांना माहिती कळताच त्यांनी तातडीने वरिष्ठांना कल्पना दिली, तसेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गिरी यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवले. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपचारादरम्यान गिरी यांची प्राणज्योत मालवली. गिरी यांनी आत्महत्या का केली, याबाबतचा तपास बुलढाणा पोलिस करत आहेत. गिरी हे आज आमदार निवास अथवा कार्यालयाकडेदेखील गेले नव्हते. आज त्यांची साप्ताहिक सुट्टी होती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबीक किंवा वैयक्तिक कारण असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या घटनेने बुलढाणा पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच, कुटुंबीयांना धीर दिला व तपासाबाबत सूचना केल्या होत्या. दरम्यान, या घटनेची माहिती आमदार श्वेताताई महाले यांच्या कार्यालयातील सहकारीवर्गाला कळताच त्यांनाही मोठा धक्का बसला होता. अंगरक्षकाने आत्महत्या केल्याची बातमी समजतात भाजप आमदार श्वेताताई महाले यांनी तात्काळ बुलढाणा येथील पोलिस वसाहतीतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन नातेवाईकांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!