Breaking newsHead linesMaharashtraWomen's World

वादग्रस्त पूजा खेडेकरचे आयएएस पद रद्द; यूपीएससीची मोठी कारवाई!

– पूजा खेडकर म्हणणे मांडण्यासाठी यूपीएससीसमोर गेलीच नाही!
– म्हणे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी खोलीत बोलावले, पण मी गेले नाही!

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या केंद्रीय लोकसेवा आयोगासमोर (यूपीएससी) स्पष्टीकरण देण्यास अपयशी ठरल्या आहेत. पूजाला ३० जुलैपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. पण यामध्ये त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे यूपीएससीने मोठा निर्णय घेत, पूजाला दोषी ठरवले आहे. आयोगाने नागरी सेवा परीक्षा-२०२२ची तात्पुरती शिफारस केलेली तिची उमेदवारी रद्द केली, आणि तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून कायमचे काढून टाकल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पूजा खेडकरचे आयएएस पद तात्पुरते रद्द झालेले आहे. दुसरीकडे, पूजाच्यावतीने तिच्या वकिलांनी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर कोर्ट उद्या (दि.१ ऑगस्ट) निर्णय देणार आहे.

यूपीएससीने प्रेस नोट जारी करत, पूजा खेडकरला २०२२ साली आम्ही दिलेले आयएएस पद तात्पुरते रद्द करत आहोत, असे म्हटले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकरला दोषी ठरवण्यात आले असून, पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी यूपीएससीची फसवणूक केली होती. पूजाविरोधात यूपीएससीने दिल्लीमध्ये गुन्हा दाखल केला होता. तिला यूपीएससीने चौकशीसाठी बोलावले होते. पण ती अद्याप चौकशीसाठी हजर झालेली नाही. सध्या पूजा खेडकरचा फोन नॉटरिचेबल लागत आहे. त्यामुळे पूजा खेडकर सध्या कुठे आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, बनावट प्रमाणपत्राद्वारे आरक्षणाचा लाभ घेणे, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे, तसेच खासगी वाहनावर लाल अंबर दिवा लावणे, असे विविध आरोप पूजा खेडकरवर आहेत. त्याचसोबत याप्रकरणात तिच्या आई-वडिलांच्या अडचणीदेखील वाढल्या आहेत. पूजा खेडकरची आई तुरूंगामध्ये आहे. तर तिच्या वडिलांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पूजा खेडकरविरोधात यूपीएससीने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर तिने पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आता यावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या कोर्ट काय निर्णय देतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Image
खासगी गाडीवर लालदिवा लावला अन् भंडाफोड झाला.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत पूजाचे वकील अ‍ॅडव्होकेट माधवन यांनी एक गंभीर आरोप केला. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचे ते कोर्टात म्हणाले. अ‍ॅड. माधवन यांनी न्यायालयात पूजा खेडकरची बाजू मांडताना म्हटले की, याप्रकरणात गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. यूपीएससीकडून दररोज पत्रकारपरिषद घेतली जात आहे. पूजा खेडकर कधीच प्रसारमाध्यमांसमोर गेल्या नाहीत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सांगण्यावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. या सुहास दिवसे यांच्याविरुद्ध पूजाने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. दिवसे यांनी पूजाला त्यांच्या खोलीत यायला सांगितल होते. मात्र, पूजाने त्याला नकार दिला, असा दावा अ‍ॅडव्होकेट माधवन यांनी कोर्टात केला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांनीच पूजाच्याविरोधात राज्य सरकारकडे लेखी अहवाल पाठवून तिच्या वर्तवणुकीवर आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे पूजाच्या एक एक बनावट प्रकरणाचा पर्दाफास होत गेला होता. त्यामुळे आता पूजा खेडकरने जिल्हाधिकारी दिवसे यांच्यावर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांत कितपत तथ्य आहे, याची शहानिशा कोर्ट करण्याची शक्यता आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!