CrimeNAGAR

घटस्फाेटीत पतीचा पत्नीच्या दुसर्‍या पतीवर गोळीबार; हत्राळ येथे भररात्रीचा थरार!

– दुसरं लग्न का केलं म्हणून जाब विचारायला गेला, अन् गोळीबार केला
– ग्रामस्थांनी पळवू पळवू हाणला, पोलिस येईपर्यंत बांधून ठेवला, आरोपीस अटक

शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – पत्नीने घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले म्हणून चिडलेल्या पहिल्या घटस्फाेटीत पतीने पत्नीच्या दुसर्‍या पतीच्या घरी जात तिला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यात दुसरा पती आडवा आल्याने त्याने दुसर्‍या पतीवर गोळ्या झाडल्या. एक गोळी छातीत रूतून बसली असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. गोळीबार करणारा पहिला पती पळून जात असताना ग्रामस्थांनी त्याला पकडून पळवू पळवू हाणले व पोलिस येईपर्यंत त्याला बांधून ठेवले, त्यालादेखील बराच मार लागला आहे. शेवगाव तालुक्यातील हत्राळ येथे परवा रात्री हा थरारक प्रसंग घडला. सुभाष विष्णू बडे (३०, रा. येळी, पाथर्डी) असे गोळीबार करणार्‍याचे नाव आहे. तर या घटेनत माणिक सुखदेव केदार (५५) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तर या घटनेतील जखमी केदार यांची नगर येथील रुग्णालयात जाऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट घेतली.

सविस्तर असे, की हत्राळ गावातील माणिक सुखदेव केदार यांचे कुटुंब केदार वस्तीवर राहतात, राहत्या घरात ते जेवण करत असताना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी सुभाष विष्णू बडे हा आरोपी आला व त्याने त्याच्याकडील असलेली पिस्टलमधून माणिक केदार यांच्यावर गोळी झाडली. ती गोळी केदार यांच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली असून, ते गंभीर जखमी झाले. तातडीने केदार यांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गोळीही शरीरामध्ये असल्याने त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, गोळीबारानंतर संशयित बडे याला गावातील ग्रामस्थांनी पळून पकडले व चोप देऊन बांधून ठेवले. यात आरोपी सुभाष बडे जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, अमोल आव्हाड, सुहास गायकवाड, संदिप बडे यांच्यासह पोलीस पथक हत्राळ गावात दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून रात्री उशीरा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, संशयित सुभाष बडे याला पोलिसांनी काल पाथर्डी न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्याला येत्या १ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेतील जखमी माणिक सुखदेव केदार यांचा मुलगा किरण केदार याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बडे याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत किरण केदार याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, ते सध्या स्पर्धा परीक्षा देत असून, त्यांची पत्नी सोनाली हीचा यापूर्वी बडे याच्याशी विवाह झाला होता. मात्र मागील वर्षी त्यांचा रीतसर घटस्फोट झाला आहे. यानंतर सोनली बरोबर किरण केदार यांचा विवाह झाला आहे. बुधवारी रात्री बडे हा त्यांच्या घरी आला व त्याने सोनाली हिला मी तुला एवढे जपत असतानाही तू दुसरे लग्न का केले, असे म्हणत मारहाण केली. या वेळी त्याच्या हातात पिस्तूल असल्याने केदार यांचे वडील माणिक केदार हे बडे याला समजावून सांगत असताना, त्याने पिस्तूलमधून माणिक केदार यांच्या छातीत गोळी मारल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, काल बडे याला या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला येत्या १ जुलै २०२४ पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!