लहरी मोसमी पावसाला शेतकरी वैतागला!; राहिलेल्या पेरण्या सुरू; पण पावसाचा पत्ताच नाही!
– पावसाने दडी मारल्यास शेतकर्यांवर कोसळणार मोठे संकट!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, मेरा बुद्रूक आणि लव्हाळा मंडळात पावसाने हुलकावणी दिली असून, केवळ रिमझिम पावसाच्या सरीवर पेरणीला सुरुवात झालेली आहे. आजही शेत काळेशार असून, हिरवी चादर ओढून धरणीमाता सुगीचे दिवस कधी दाखवणार! या चिंतेत शेतकरी आहे. तर कपाशीला पिकाला तुषार सिंचनाच्या सहाय्याने पाणी देण्याची वेळ आलेली आहे.
साखरखेर्डा मंडळात ६ हजार ५३९ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे तर शेंदुर्जन ६ हजार ३६५, मलकापूर पांग्रा ६ हजार ६३० आणि मेरा बुद्रूक, लव्हाळा मंडळात १२ हजारांपेक्षा जास्त क्षेत्रफळ पेरणी केली जाते. जून महिन्यात या पाचही मंडळात ५० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला नाही. एका भागात पडला तर दुसर्या भागात नाही, अशी गत झाली आहे. जूनअखेर शेतकर्यांनी वङ्कामूठ आळवीत पेरणीला सुरुवात केली. जवळजवळ ८० टक्के पेरणी झाली. २० टक्के पेरण्या ३० जूनपर्यंत पूर्ण होतील. ज्या शेतकर्यांनी कपाशीची लागवड केली आहे, ते शेतकरी तुषार सिंचन करीत आहेत. परंतु, सोयाबीन पिकाला पुरेल एवढे पाणी उपलब्ध नसल्याने निसर्गाच्या भरवशावर राहावे लागत आहे. साखरखेर्डा भागात २७ जूनला पाऊस पडण्याचा अंदाज गुगल, भविष्यकार, वैज्ञानिक यांनी व्यक्त केला. आजचा दिवस पूर्ण कोरडा गेला. १० जूननंतर २३ तारखेला सवडद, साखरखेर्डा भाग एकमधील पूर्वेकडील बाजू, गुंज, मेरा बुद्रूक, पिंपळगाव सोनारा या भागात तर २४ तारखेला गोरेगाव, शेंदुर्जन, बाळसमुंद्र, जागदरी, आंबेवाडी, कंडारी, भंडारी, आणि साखरखेर्डा भाग २, तांदुळवाडी असा भीज पाऊस पडला. जमीन ओली झाली, त्यावर पेरणी केली. आता काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अख्या जून महिना पावसाअभावी खाली गेल्याने खरीप पिकावर चांगलाच परिणाम होणार आहे.
साखरखेर्डा भाग एकमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने तुषार सिंचन करावे लागत आहे. शेती बटाईने करीत असताना दुष्काळाचे सावट पसरले तर पोट कसे भरायचे. याची चिंता सतावत आहे.
– किशोर देशमुख, शेतकरी साखरखेर्डा
———-