बिल्डरला तब्बल आठ लाखांची लाच मागितली; नगरचे महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे लिपिकासह फरार; घर, कार्यालय एसीबीकडून सील!
नगर (विशेष प्रतिनिधी) – बिल्डरला तब्बल आठ लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी अहमदनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपतविरोधी विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली असून, त्यांचे राहते घर सील केले आहे. मनपातील लिपिक शेखर देशपांडे याच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती. एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तांसह लिपिक फरार झाले आहेत. या प्रकरणात एसीबीने डॉ. पंकज जावळे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्यांचे राहते घर सील केले आहे. तसेच, पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बांधकाम परवानगी देण्यासाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी ८ लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर संबंधित बिल्डरने पुराव्यानिशी ठेवला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. याच प्रकरणात दि. १९ आणि २० जूनरोजी ही लाच मागितली होती. महापालिकेचा लिपिक शेखर देशपांडे याच्यामार्फत हे पैसे मागितले गेले होते. त्यानंतर या प्रकरणाची एसीबीकडे तक्रार गेल्यानंतर एसीबीने कारवाई सुरू केली. एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिक शेखर देशपांडेच्या बुर्हाणनगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला आहे. तर आयुक्ताचे राहते घर लाचलुचपत विभागाने सील केले आहे. आयुक्त पंकज जावळे फरार झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयाबाहेर लाचलुचपत विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. गुरुवारी सकाळी सात वाजेपासून एसीबीने ही कारवाई सुरू केली होती, या कारवाईसंबंधीची मोठी गुप्तता पाळण्यात आली.
———
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त पंकज जावळे यांनी लिपिक देशपांडे यांच्यामार्फत आठ लाखांची लाच मागितली होती. त्यानुसार गुरूवारी ही लाच स्वीकारण्यात येणार होती. पण एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त आणि लिपिक दोघेही फरार झाले. महत्त्वाचे म्हणजे या दोघांनीही गुरुवारी शासकीय रजा टाकल्याची माहिती समोर आली आहे. लिपिक शेखर देशपांडे याच्या बुर्हाणनगर येथील घरावर छापेमारी करण्यात आली आहे. तर आयुक्त फरार झाल्यानंतर त्यांचे शासकीय निवासस्थान सील करण्यात आले आहे. ते जेव्हा समोर येतील त्यावेळी त्यांच्यासमोर या घराची झाडाझडती घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अहमदनगरमध्ये एका कंपनीला कन्स्ट्रक्शन फर्मचे बांधकाम करायचे असल्याने त्यांनी महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र या परवानगीसाठी मनपा आयुक्त जावळे यांनी आपल्या लिपिकामार्फत लाच मागितली. तर लाच देण्याचे ठरल्यावर परवानगी देण्यासाठी संमती दर्शवली. मात्र संबंधित कंपनीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीच्या जालना युनिटकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची खात्री केली. 19 आणि 20 जून रोजी ही लाच मागण्यात आली होती. जावळे यांनी लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यावर पथकाने कारवाईसाठी आज (गुरुवार, 27 जून) सापळा रचला होता. पण या कारवाईची कुणकुण लागतातच आयुक्त जावळे आणि त्यांचा लिपिक देशपांडे दोघेही महानगरपालिकेत आलेच नाही. याप्रकरणी आता एसीबीने पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अहमदनगर मनपा आयुक्तांनीच लाच मागितल्याचा आरोप झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एसीबीच्या पथकाने आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी छापा टाकत तपासणीदेखील केल्याची माहिती मिळत आहे. सोबतच दुसरा संशयित आरोपी देशपांडेच्या घरीदेखील छापा टाकत चौकशी केली जात आहे.