Breaking newsBULDHANAChikhaliDEULGAONRAJAHead linesSINDKHEDRAJAVidharbha

शक्तीपीठ महामार्गानंतर भक्तीमहामार्ग रद्दसाठीही शेतकरी आक्रमक; अनेक गावांत शेतकरी रस्त्यावर उतरले!

चिखली (महेंद्र हिवाळे) – एकीकडे कोल्हापुरातील शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आक्रमक आंदोलन करत असताना, दुसरीकडे सिंदखेडराजा-शेगाव या भक्ती महामार्गालाही तितकाच तीव्र विरोध सुरू आहे. मुंबईत राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना चिखली व सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावांत शेतकरी रस्त्यावर उतरून भक्तीमहामार्गाला तीव्र विरोध करताना दिसून आलेत. प्रस्तावित सिंदखेडराजा – शेगाव महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी महामार्गविरोधी कृती समितीने जाहीर केल्यानुसार महाराष्ट्र विधानमंडळ अधिवेशन सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचे लक्ष वेधण्यासाठा गावागावातील शेतकरी व शेतकरी महिलांनीसुध्दा शेतात, गावामधे थाळीनाद व रस्तारोको आंदोलने केलीत. सकाळपासून चिखली तालुक्यातील विविध गावांमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर या महामार्गावरील ४३ गावांनी आक्रमक रूप धारण केले. जमीन आमच्या हक्काची, शेतकऱ्याला भूमिहीन करू नका, देशोधडीला लावू नका ! अशा घोषणांनी ही संपूर्ण गावे दणाणून गेली आहे. यामध्ये अंत्री खेडेकर, पांढरदेव, टाकरखेड, करतवाडी यासह ४६ गावांमधील गावकऱ्यांचा समावेश आहे. कृती समितीच्यावतीने सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते.

आज चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांत झालेल्या आंदोलनांत अंढेरा, सेवानगर, अंत्रीखेडेकर, गांगलगाव, पांढरदेव, करतवाडी, घानमोडी, मानमोडी, टाकरखेड मुसलमान यासह बहुतांश गावे सहभागी झाली होती. या गावांतील शेतकर्‍यांनी थाळीनाद करुन महामार्गाला एकजुटीने विरोध दाखवला. ‘कृती समितीचा एकच नारा – महामार्ग रद्द करा ‘, अशा यावेळी शेतकरी व शेतकरी महिला देत होत्या. आंदोलनस्थळी महिला ढसाढसा रडल्याने पुरुषांनाही अश्रू आवरता आले नाही. या आंदोलनात गावोगावच्या शेतकर्‍यांसोबत शेतकरी नेते दासा पाटील कणखर, डॉ.सत्येंद्र भुसारी, सौ. ज्योतीताई खेडेकर, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, मुरलीधर येवले, रमेश सपकाळ आदी सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. समाधान म्हस्के, मधुकर सपकाळ, चेतन म्हस्के, नितीन म्हस्के, पंजाबराव कणखर, संदीप म्हळसणे, भागवत सपकाळ, शेषराव पाटील, बंडू जाधव, भारत म्हस्के, मदन वाघ, सोम प्रकाश खेडेकर, भिकाजी खेडेकर, एकनाथराव माळेकर, अक्षय वाघ, मधुकर वाघ, परमेश्वर म्हळसणे, सौ.शीलाबाई सपकाळ, सौ.दुर्गाबाई थिगळे आदीसह असंख्य शेतकरी व महिलांनी या आंदोलनात आक्रमकपणे सहभाग घेतला.
———

सिंदखेडराजा येथून संतनगरी शेगावला जाण्यासाठी इतर पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. उपलब्ध मार्ग चांगल्या स्थितीत आहे. कोणाचीच मागणी नसताना राज्य सरकार या महामार्गासाठी आग्रही का आहे? हे न उलगडणारे कोडे असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई खेडेकर यांनी सांगितले. यामुळे आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, आज ४६ गावांतील आबालवृद्ध गावकरी यात सहभागी झाल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील महायुतीचे सरकार हा प्रस्तावित महामार्ग रद्द करण्याची घोषणा करीत नाही, तोपर्यंत वेळोवेळी आंदोलन करतच राहणार, असा इशाराही खेडेकर यांनी चर्चे अंती दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!