चिखली (महेंद्र हिवाळे) – सलग चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजयी होण्याचा इतिहास घडवणारे नव नियुक्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा महायुतीच्यावतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी (दि.२९ जून) श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात दुपारी एक वाजता या सत्कार समारंभाचे आयोजन केले असून, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यानिमित्त महायुतीमधील अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारीदेखील या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सत्कार सोहळ्यासाठी तालुक्यातील महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
सन २००९ पासून सलग चारवेळेस बुलढाणा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याचा इतिहास खा.प्रतापराव जाधव यांनी घडवला. त्यामुळे यंदाच्या त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा विशेष आनंद भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीमधील घटक पक्षातील पदाधिकार्यांना सहाजिकपणे झाला. यात भर म्हणजे खा. प्रतापराव जाधव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) या महत्त्वाच्या स्थानावर वर्णी लागली. पंतप्रधान मोदी यांच्या समावेत मंत्रिपदाची शपथ घेण्याचा बहुमान प्रतापराव जाधव यांना मिळाल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील जनतेलादेखील मोठा आनंद वाटला. एकूणच प्रतापराव जाधव यांच्या केंद्रीय मंत्रीपदामुळे महायुतीसह जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चिखली तालुक्यातील महायुतीच्यावतीने प्रतापराव जाधव यांच्या भव्य सत्काराचे आयोजन दिनांक २९ जूनरोजी करण्यात आले आहे. आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत क्रांती संघटना व पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदी पक्षांचे पदाधिकारी व नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
खामगाव चौफुली येथे सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे आगमन होणार असून, तेथून भव्य रॅलीला सुरुवात होईल. बसस्थानकमार्गे महाराणा प्रताप पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले पुतळा यांना अभिवादन करून ही रॅली श्री शिवाजी विद्यालयातील सभागृहापर्यंत पोहोचेल. या ठिकाणी ना. जाधव यांचा महायुतीच्यावतीने भव्य सत्कार करण्यात येईल. या सत्कार समारंभास भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंह राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड नाझीर काझी, मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, पीरीपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, रयत क्रांती संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या सत्कार समारंभासाठी महायुतीमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते व नागरिक बंधूभगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख गजाननसिंह मोरे, शहर प्रमुख विलास घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार, शहराध्यक्ष तुषार बोंद्रे, मनसेचे शहराध्यक्ष नारायण देशमुख, आरपीआयचे तालुकाध्यक्ष हिम्मतराव जाधव यांनी केले आहे.