बिबी (ऋषी दंदाले) – येथून जवळच असलेल्या किनगावजट्टू येथे मुक्कामी थांबलेल्या दोन एसटी बसेसच्या डिझेल टाकीचे कुलूप व झाकण तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रत्येकी २०० लीटर याप्रमाणे दोन बसमधून तब्बल ४०० लीटर डिझेल चोरले आहे. आज सकाळी ५ वाजता बसची तपासणी करताना हा धक्कादायक प्रकार चालकाच्या निदर्शनास आला. याप्रकरणी बिबी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
सविस्तर असे, की अकोला ते किनगावजट्टू व लोणार ते किनगावजट्टू या दोन बस गेल्या कित्येक वर्षापासून किनगावजट्टू येथे मुकामी असतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अकोला आगारची बस क्र.एम.एच.४० एन.८९२२ ही चालक प्रवीण प्रकाश तांबट व वाहक निवृत्ती मनोहर भोसले हे येथे घेऊन आले व बिबी-किनगावजट्टू रोडवर कॅन्टीनसमोर उभे करून दोघेही चालक व वाहक बसमध्येच झोपले. तसेच, दुसरी लोणार ते किनगावजट्टू ही बस क्र. एम.एच.४०.एन.८९२१ ही चालक महादेव किसन नालेगावकर व वाहक ए.बी.राठोड हे घेऊन आले व ते ही बस लोणार- किनगावजट्टू रोडवर लावून रात्री १० वाजता जेवण करून दोघेही बसमध्येच झोपी गेले. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी येऊन या दोन्ही एस.टी बसमधून प्रत्येकी किमान २०० लीटर असे ४०० लीटर डिझेल लंपास केले. सकाळी पाच वाजता झोपेतून जागी होऊन चालकाने बस तपासली असता, त्यांना डिझेल टाकीचे झाकण व कुलूप तुटलेले आढळून आले. या घटनेची माहिती दोन्हीही चालकांनी आपल्या वरिष्ठांना दिल्यानंतर, बिबी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शिंदे व बोरे हे करीत आहेत.