तब्बल १० दिवसानंतर प्रा. लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित; राज्य सरकारचे लेखीपत्र!
– औकातीत राहा बेट्या हो..मनोज जरांगेंवर छगन भुजबळ कडाडले; पंकजा मुंडेंच्या पराभवाचाही उल्लेख!
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकार्यांचे आमरण उपोषण राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या यशस्वी शिष्टाईनंतर सुटले आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा केली. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यावर मध्यममार्ग काढून तोडगा काढू, कोणावरही अन्याय होवून देणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांना आश्वस्त केलेले आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात राज्य सरकारचे शिष्टमंडळ प्रा. हाके यांच्या आंदोलनस्थळी गेले होते. आंदोलन स्थगित झाल्यानंतर भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले. ”औकातीत राहा बेट्या हो.. आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत. आम्ही जनावरं नाही. कुठेही न्यावं. ते माकडं म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं. अरे काय बोलतो त्याला कळत नाही. काय बोलावं कुठं बोलावं कळत नाही. मी त्याला बोलण्याऐवजी हाकेंसोबत त्याने चर्चा करावी मग आमच्याकडे यावं”, अशी टीका भुजबळ यांनी करून, याप्रसंगी पंकजा मुंडे यांच्या बीडमधील पराभवावरही भाष्य केले. तर दुसरीकडे, मनोज जरांगे हेदेखील आक्रमक झाले आहेत. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी बलिदान देऊ, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकार्याने उपोषण आंदोलन पुकारले होते. त्यांच्या उपोषणाचा आजचा १० वा दिवस होता. त्यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे आले होते. या शिष्टमंडळात माजी मंत्री व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अुतल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, गोपीचंद पडळकर यांच्यासह १२ जणांचा समावेश होता. या सर्वांनी उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा करत, त्यांना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी हाके आणि वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. त्याशिवाय, सरकार कुणावरही अन्याय करणार नाही, याचे आश्वासनही दिले. आपल्या मागण्याबाबत सरकार गंभीर आहे, त्याशिवाय सकारात्मक चर्चा झाली आहे, असा विश्वासही यावेळी छगन भुजबळ यांनी हाके यांना दिला. शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतर व लेखी पत्र मिळाल्यानंतर प्रा. हाके व वाघमारे यांनी आपले उपोषण आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी प्रा. हाके म्हणाले, की बोगस सर्टिफिकेट देणार्यांवर आणि घेणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले. त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावे. या सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. पंचायतराजच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षण देऊन घेणार की त्याशिवाय घेणार हे शासनाने स्पष्ट करावे. अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार असून, त्यामध्ये चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल, असेही या सरकारने आश्वासन दिलेले आहे. आता या सरकारने आश्वासन दिले आहे, पण केवळ त्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आता ते फक्त तात्पुरते स्थगित केलं आहे, असेही प्रा. हाके यांनी सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, आमच्यावरचा अन्याय कधी संपणार? आता त्यांची दादागिरी चालणार नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे यावेत यासाठी आरक्षण आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पाडले. पण लढाई आता संपली नाही. आम्ही कुणालाही घाबरत नाही. यापुढे तुम्ही सगळे एकत्र राहिला तर तुमचे आरक्षण टिकेल. हातावर हात ठेवून बसलात तर काही होणार नाही. यापुढे लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होणार. विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण हवे, जातनिहाय जनगणनेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा आहे. काहीजण ओबीसी प्रवर्गातून आणि १० टक्क्यातूनही आरक्षण घेतात. खोटे कुणबी दाखले देणार्यांवर गुन्हे दाखल करणार. ओबीसींना प्रमाणपत्र हवे असेल तर १० महिने थांबावे लागले. आपल्याला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. दलित आदिवासी समाज तुमच्यासोबत आहे. राज्यात अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटले. ज्यांनी खोटे दाखले वाटले, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. खोटे दाखले पुन्हा एकदा तपासले जाणार. खोटे दाखले देणार्यांवर गुन्हा दाखल होणार. पूर्वीचे जे नियम आहेत, ते सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार आहेत, असेही भुजबळ यांनी याप्रसंगी सांगितले.—
– प्रा. हाके यांच्या मागण्या –
१) ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये. तसे लेखी आश्वासन मुख्यमंत्री महोदयाकडून मिळाले पाहिजे.
२) कुणबीच्या लाखो बोगस नोंदीची त्वरित दखल घेवून त्या रद्द करण्यात याव्यात.
३) ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाना आर्थिक तरतूद व्हावी.
४) ओबीसीच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्हात योजना कार्यान्वित व्हावी.
५) ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी.
—
जातनिहाय जनगणना करा – खा. उदयनराजे भोसले
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. मी जातपात मनात नाही. पण मराठा आरक्षणप्रश्नी २३ मार्च १९९४ चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे. त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी असे सर्वांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून, दिवसेंदिवस जातीजातीत दुफळी माजत असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव येथे आपल्या भाषणात सांगितले. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करून ज्यांना त्यांना वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाकावे, अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली.
————-