शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – सार्वजनिक बांधकाम विभाग शेवगावचे उपअभियंता प्रल्हाद पाठक यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अन्यथा आमरण उपोषणास बसण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक धनवडे व चंद्रकांत मोहिते यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगरचे अधीक्षक अभियंता व संबधितांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
उपअभियंता पाठक हे सुमारे १५ वर्षापासून शेवगाव येथे कार्यरत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्या इतरत्र बदल्या झाल्या मात्र तरीही त्यांनी आपले राजकीय हितसंबंध वापरत शेवगाव येथेच कायम रुजू राहिले. अनेक वेळा बदल्या झाल्या तरी दीर्घकाळ एकाच ठिकाणी नियुक्ती असल्याने त्यांची व ठेकेदारांची मिलीभगत झाली असून, त्यांच्या कालावधीत जी रस्त्यांची व विविध झालेली इतर कोट्यवधी रुपयांची बांधकामे झाली, ती सर्व अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना, आमदार निधी, खासदार निधी यांच्यामार्फत या कार्यालयाला श्री पाठक यांच्या कालावधीत किती निधी आला, तो कोठे व कधी खर्च झाला याची दर्जा व गुणवत्ता नियंत्रक पथकामार्फत खातेनिहाय सखोल चौकशी करण्यात यावी, व त्यात दोषी आढळणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता, त्या-त्या कामाचे ठेकेदार आणि संबधितांवर कठोर कारवाई करावी, येत्या दोन महिन्याच्याआत चौकशी व कारवाई झाली नाही तर अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्य सचिव, मुख्य अभियंता, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.