BuldanaBULDHANAVidharbha

महाभ्रष्ट भाजप सरकारविरोधात आज काँग्रेसचे बुलढाण्यात ‘चिखल फेको’ आंदोलन

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील व राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना, महाभ्रष्ट महायुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वार्‍यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष आज (दि.२१) बुलढाणा येथे दुपारी एक वाजता महायुती सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करणार आहे. स्थानिक जयस्तंभ चौकात हे आंदोलन होणार आहे.

राज्यातील जनता विविध समस्यांचा सामना करीत असून, महाभ्रष्ट महायुती सरकार जनतेच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. महायुती व एनडीए सरकारच्या काळात महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देऊन जातीधर्माच्या नावाखाली सामाजिक सलोखा बिघवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे, असा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे निर्देशानुसार जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक जयस्तंभ चौकात आज, दुपारी १ वाजता निष्क्रिय महायुती सरकारच्या प्रतिमेवर चिखलफेक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सतिष महेंद्रे यांनी केले आहे, असे काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाप्रमुख श्लोकानंद डांगे यांनी कळविले आहे.

महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बि-बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकर्‍यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून, सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली. या आंदोलनात जिल्ह्यातील प्रमुख नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, इंटक, सेल व विभाग यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाजप सरकारचा निषेध करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!