सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेतीतस्करीला आळा घालण्याचा प्रयत्न महसूल प्रशासन करत असतानाही रेतीतस्कर मात्र मुजोर झाले असून, खुलेआम वाळूचोरी करतच आहेत. तर मंडपगाव येथील नदीपात्रातून वाळूचोरी करणार्यांविरोधात गावानेच एल्गार पुकारला असून, रेतीतस्करांना रेतीचोरीस मनाई केली आहे. दरम्यान, जांभोरा शिवारात महसूल पथकाने अवैध रेतीवाहतूक करणारे टिप्पर पकडले असून, टिप्परसह एक ब्रास रेती हस्तगत केली आहे.
जांभोरा शिवारातून आज (दि.२०) अवैधरित्या रेती वाहतूक करत असलेले टिप्पर क्रमांक एमएच २८ बीक्यू २७५७ हे तलाठी यांना दिसून आले. हात इशार्याने ते थांबवले असता, सदर वाहनात एक ब्रास रेती आढळून आली. वाहन चालकाकडे रेती परवानाबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे परवाना नसल्याचे वाहन चालक विष्णु गायके याने सांगितले. या टिप्परमध्ये एक ब्रास रेती होती. यावेळी सदर गाडीचा पंचनामा तलाठी किनगांवराजा, तलाठी विझोरा, तलाठी दुसरबीड, तलाठी जऊळका यांनी करून सदर वाहन किनगावराजा पोलीस स्टेशनला अटकाव करण्यात आले आहे. पुढील तपास महसूल प्रशासन व पोलिस करत आहेत.