Chikhali

चिखली तालुक्यात स्टॅम्प पेपरचा तुटवडा; विद्यार्थी, शेतकरी परेशान!

– उदयनगर सरपंच लाहुडकर यांच्याविरूद्ध दाखल खोटे गुन्हे मागे घेण्याचीही काँग्रेसची मागणी

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून स्टॅम्प पेपर (मुद्रांक) तुटवडा निर्माण झाला असून शाळा, महाविद्यालय प्रवेशाचे दिवस आणि पेरणीच्या दिवसात विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांना स्टॅम्पची गरज असतांना तुटवडा निर्माण होणे चुकीचे आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चिखली तहसील कार्यालय परिसरात स्टॅम्प खरेदीसाठी दररोज गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक दिवस चकरा माराव्या लागतात, कधीच सकाळी स्टॅम्प मिळत नाही. दुपारी तीन वाजेपर्यंत भरउन्हात ताटकळत बसावे लागते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता स्टॅम्प पेपरचा तुटवडा दूर करून नागरिकांचा त्रास वाचावा, यासाठी चिखली तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्या नेतृत्वात पदाधिकार्‍यांसह चिखली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच, उदयनगर येथील बाळापूर-उदयनगर-वरवंड या मार्गावरील सहकार विद्या मंदिर उदयनगरजवळील पुलाचे बांधकाम सुरू असतांना पुलाचे पाणी शेतात येईल, म्हणून संरक्षण भिंत बांधण्याची रास्त मागणी करणार्‍या सरपंच मनोज लाहुडकर व त्यांच्या सहकार्‍यांवर खोटे गुन्ह दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग खामगांवचे कनिष्ठ अभियंता यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेता अमडापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तकारीवरून हेतुपुरस्सर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात येवून, सदर प्रकरणी रास्त मागणी करणार्‍यांच्या विरोधात तकार करणार्‍या अधिकार्‍यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदनही चिखली काँग्रेसच्यावतीने काल तहसीलदार चिखली यांना देण्यात आले आहे.

सत्येद्र भुसारी व त्यांच्या सहकार्‍यांनी चिखली तहसीलदार यांना दण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की चिखली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाला असून, विद्यार्थी व शेतकर्‍यांना नाहक त्रास होत आहे. तालुक्यातील गावोगावच्या शेतकर्‍यांना शेतीविषयक कामे, पीककर्ज आदी कामांना स्टॅम्प आवश्यक असतात, आणि शालेय प्रवेश प्रक्रियेसाठी जी कागदपत्रे लागतात, विविध प्रतिज्ञालेख, उत्पन्न दाखला, कास्ट सर्टिफिकेट, आदिवास प्रमाणपत्र अशा अनेक कामांसाठी स्टॅम्पची आवश्यकता भासते. तहसील परीसरातील स्टॅम्प विक्रेत्यांकडे मात्र स्टॅम्प मिळत नाहीत, दिवसभर ताटकळत बसूनही स्टॅम्प मिळत नसल्याने शेतकरी, विद्यार्थी व नागरीक त्रस्त झाले आहेत. चिखली तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांचा त्रास दूर करण्यासाठी स्टॅम्प पेपरचा तुटवडा दूर करण्यात यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन देतेवेळी चिखली तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ.सत्येंद्र भुसारी यासह सरपंच बबनराव पानझाडे, राहुल इंगळे, रामेश्वर भुसारी, समाधान आकाळ, विनोद आंभोरे, राजेंद्र शेळके यांसह पदाधिकारी उपस्थित होते.


चिखली तालुक्यातील उदयनगरचे सरपंच तसेच चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सामाजिक, राजकीय कार्यात सदैव अग्रेसर असणारे मनोज लाहुडकर यांच्याविरूध्द हेतुपुरस्सर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. उदयनगर-करवंड रस्त्यावर मनोज लाहुडकर यांची मालकीची जागा आहे. लागूनच रस्त्याचे काम सुरू असून त्याठिकाणी पुलाचेही बांधकाम करण्यात येत आहे. सदर पुलाचे पाणी लाहुडकर यांच्या जागेत येवून नुकसान होईल, म्हणून त्या ठिकाणी पूरसंरक्षक भिंत बांधून द्या, अशी विनंती संबंधित अभियंता व ठेकदार यांच्याकडे लाहुडकर यांच्याकडुन वारंवार करण्यात आलेली आहे. मात्र हेतुपुरस्सर सदर मागणीकडे दुर्लक्ष करून त्या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. उलट याठिकाणी पाणी जागेत घुसून नुकसान होण्याची परिस्थिती अधिकार्‍यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणे गुन्हा आहे काय? संबंधित अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात आली, मात्र चूक लक्षात घेवूनही कबूल न करता उलट त्याचा विपर्यास करून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मनोज लाहुडकर यांच्याविराधांत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून भादंवि कलम अ.क.१७५/२४ कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे खाटे गुन्हे दाखल केले आहे. वस्तुतः उपरोक्त प्रकरणी जमिनीत पाणी घुसून नुकसान होवू नये म्हणून करण्यात आलेली उपरोक्त मागणी मान्य न करणे, व त्याउलट सरकारी कामात अडथळा आणल्याचे दर्शवून खोटे गुन्हे दाखल करणे हा प्रकार अन्यायकारक आहे. याचा अर्थ लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या अधिकार्‍यांकडे आपली न्यायिक बाजूसुध्दा मांडू नये काय? तर सरकारी धोरण राबविणार चुकीचे वागत असतील तर त्यांच्याविरूध्द आवाजही उठू नये व तसे केल्यास गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्ह दाखल करण्याचे सत्रच चिखलीत चालू झाले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होवून निकोप लोकशाहीसाठी व सामाजिकहिताच्या दृष्टीने वरील प्रकार अत्यंत घातक आहे. वरील प्रकरणी लाहुडकर व मोहता यांच्यावरील दाखल करण्यात आलेले खोटे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तात्काळ मागे घेवून त्यांना न्याय मिळून द्यावा, तसेच परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेता एकतर्फी गुन्हे दाखल करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी व कारवाई करण्यात यावी, असेदेखील या निवेदनात नमूद आहे. हे निवेदन देतेवेळी चिखली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, माजी सभापती विष्णू पाटील कुळसुंदर, डॉ. सत्येंद्र भुसारी, अशोकराव पडघान, ज्ञानेश्वर सुरूशे, बाजार समितीचे संचालक रामभाऊ जाधव, संजय गवई, बिंदूसिंह इंगळे, समाधान परिहार, श्रीकिसन धांडगे, संतोष वाकड, शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष नीलेश अंजनकर, अनंता जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!