निसर्गासोबत जुगाड खेळणे पडले महागात; पेरण्या उलटल्या, आता दुबार पेरणीचे संकट!
– भाव मिळत नसतानाही यंदाही सोयाबीनचाच सर्वाधिक पेरा!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा परिसरात मागील ९ आणि १० जूनरोजी जोरदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील अनेक गावात खरीप हंगामातील पेरणीस सुरूवात झाली. शेतकर्यांनी पेरणी केली पण हा निसर्गाशी खेळलेला जुगार चांगलाच अंगलट आला आहे. अवकाळी पावसाने दिला दिलासा, मोसमी पावसाने फिरविली पाठ अशी गत झाल्याने शेतकर्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे.
मागील हंगामातील सोयाबीनला अपेक्षेप्रमाणे भाव न मिळूनही यावर्षीसुध्दा सोयाबीनच्या पेरणीकडे सर्वात जास्त शेतकर्यांचा कल दिसून येत आहे. परिसरासह संपूर्ण तालुक्यात सोयाबीनची पेरणी सर्वात जास्त म्हणजे ४५ टक्के क्षेत्रावर होणार असून, त्याखालोखाल ३५ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जात आहे. तूर हे पीक संमिश्र पिकांबरोबर घेतले जात असून, तुरीला बर्यापैकी भाव मिळत असल्याने तुरीचा पेरा ७ टक्के हेक्टरवर होत आहे. थोड्याफार प्रमाणात मूग, मका, उडीद असा क्रम राहणार असल्याचा अंदाज आहे. तालुक्यात ७८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सरासरी हेक्टर क्षेत्रावर खरीपातील पिकांची पेरणी होणार आहे. एकूण भौगोलिक क्षेत्र ७८,११५ हेक्टर इतके असून, त्यापैकी ७२,५५४ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी खरीप हंगामातील पेरणीसाठी वहित केलेले क्षेत्रावर यावर्षी खरीपातील प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, तीळ आदी पिकांची पेरणी केली जाणार आहे. सर्वात जास्त ३७,९८० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाणार असून, त्याखालोखाल २५,१९५ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाणार आहे. ४,८९० हेक्टर क्षेत्रावर तूर, ५१३ हेक्टर क्षेत्रावर मूग, ५१५ हेक्टर क्षेत्रावर उडीद आणि ४०० हेक्टर क्षेत्रावर मका आणि सुमारे ५०० हेक्टरवर भुईमूग, तीळ, कराळे, भाजीपाला ही पिके घेतली जाणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
परिसरात १० जून रोजी रात्री वादळी पावसाने हजेरी लावली होती. तत्पूर्वी ९ तारखेलासुध्दा दुपारी तीन वाजेनंतर बर्यापैकी पाऊस झाला होता. शेंदुर्जन भागात मान्सूनपूर्व रोहिणी नक्षत्रातही बर्यापैकी पावसाने हजेरी लावली होती. १० जूनरोजी झालेल्या वादळी पावसाने जमिनीतील ओलावा पेरणीयोग्य झाल्याने कपाशी तथा कपाशी बिजोत्पादन प्लॉट लागवड करणार्या शेतकर्यांनी मृग नक्षत्रातील पेरणीचा लाभ घेण्यासाठी दुसर्याच दिवशी कपाशीच्या लागवडीस सुरूवात केली. आणि साखरखेर्डा परिसरातील गोरेगाव, तांदुळवाडी, पांगरी काटे, शेंदूर्जन, दरेगाव, लिंगा, राजेगाव, उमणगाव, वडगावमाळी, कंडारी, भंडारी, जागदरी, जनुना आदी भागात खरिपाच्या पेरणीस सुरूवात झाली. काही ठिकाणी सोयाबीन पेरले, मूग, उडीदही टाकला. परंतु, पाऊस या लबाड कोल्ह्याने दगा दिला. वटपौर्णिमापासून मोर पिसारा फुलवून रानोमाळ हिरवळ दाटणार आहे.
ज्यांनी मृग नक्षत्रात पेरणी केली, ती जवळजवळ तळपत्या उन्हात करपून गेली आहे. मोसमी पाऊस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात करु नये, असे असताना निसर्गासोबत जुगाड खेळणे चांगलेच महागात पडले आहे. यावर्षी सर्वात जास्त पेरा सोयाबीनचा असून, त्या खालोखाल तूर व कपाशीचा पेरा आहे. मागील हंगामातील सोयाबीन व कपाशीला अपेक्षित भाव न मिळाल्याने अनेक शेतकर्यांच्या घरात मागील वर्षीचे सोयाबीन पडून आहे. तरीही चालू हंगामात शेतकर्यांसमोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने नाईलाजाने सोयाबीन व कापूस या पिकांच्याच पेरणीकडे वळावे लागले आहे.
———-