ऐन पेरणीतोंडी शेतकर्यांची कोंडी!; ‘पणन’च्या ज्वारी खरेदीचे ३३ हजार क्विंटलचे उद्दिष्ट संपण्याच्या मार्गावर!
– नोंदणी २५ हजार शेतकर्यांची; दोन लाख क्विंटल ज्वारी खरेदीची गरज!
– राज्याचे उद्दिष्ट व खरेदीची डेडलाईन वाढवा; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची केंद्राकडे शिफारस
बुलढाणा (बाळू वानखेडे) – पणन महासंघाचे जिल्ह्याला सन २०२३-२०२४ चे ज्वारी खरेदीचे ३३ हजार क्विंटलचे उद्दिष्ट संपण्याच्या मार्गावर असून, संग्रामपूर खरेदी केंद्र उद्दिष्ट संपल्याने बंद करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे, तर खामगावसह इतरही खरेदी केंद्रे येत्या एक-दोन दिवसांत यामुळेच बंद होणार आहेत. त्यामुळे पेरणीच्या तोंडी शेतकर्यांची कोंडी होणार आहे. रब्बी ज्वारी खरेदीसाठी जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकर्यांनी नाव नोंदणी केल्याची माहिती आहे. यानुसार, जवळजवळ दोन लाख क्विंटलच्या जवळपास खरेदी व्हायला पाहिजे. दरम्यान, राज्याला ज्वारी खरेदीच्या उद्दिष्टाबरोबरच खरेदीसाठी मुदतही वाढवून देण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे दि.१८ जूनरोजी केली आहे.
बाजारभावापेक्षा जवळजवळ हजार ते बाराशे रुपये ज्यादा भाव मिळत असल्याने शेतकर्यांनी मोठ्या संख्येने पणन महासंघाकडे ज्वारी खरेदीसाठी नोंदणी केली आहे. पणनची ज्वारी खरेदी लेट सुरू झाली होती. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वस्तुनिष्ठ व सडेतोड वृत्त प्रकाशित केल्यानंतर पणन महासंघाकडून त्याची तात्काळ दाखल घेतल्याने जवळजवळ पंचवीस हजार शेतकर्यांची नोंदणी झाल्याची माहिती आहे. एकीकडे नोंदणी मोठ्या प्रमाणात होताना जिल्ह्याला उद्दिष्ट मात्र फक्त ३३ हजार क्विंटल खरेदीचे आहे. जिल्ह्यात २० केंद्रावरून ज्वारी खरेदी सुरू आहे. यामध्ये केंद्रांना दिलेल्या उद्दिष्टानुसार खरेदी सुरू असून, उद्दिष्ट संपल्याने संग्रामपूर येथील खरेदी केंद्राला कूलूप लागले आहे. याच कारणाने खामगावसह इतरही खरेदी केंद्र येत्या एक-दोन दिवसात बंद होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडी शेतकरी कोंडीत सापडल्याचे दिसत आहे.
राज्याचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अतिरिक्त ६४ हजार ४०० मेट्रीक टन ज्वारी खरेदीची परवानगी द्यावी व खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढही द्यावी, याबाबतचे पत्र या विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी उपसचिव अन्न व वितरण विभाग मंत्रालय नवी दिल्ली यांना १४ जूनरोजी दिले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात ज्वारीचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते. त्यामुळे ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून खरेदीला मुदत वाढ देण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनीदेखील उपसचिव अन्न व सार्वजनिक वितरण विभाग ग्राहक व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे १८ जूनरोजी केली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान, जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी बुलढाणा जिल्ह्याचे उद्दिष्टही वाढवून देण्याबाबत मागणी केली असून, याबाबत अधिक माहिती जाणून घेणार्या प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.