मराठा-ओबीसी संघर्ष टाळण्यासाठी मराठा महासंघाचा पुढाकार!
– सामाजिक सलोखा जपण्यासाठी मराठा महासंघ पुढाकार घेणार : संभाजीराजे दहातोंडे
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत यंदा राज्यभर जातीय कटुता निर्माण झाली. त्यामुळे गावखेड्यातील जातीयसलोखा दूषित झाला. अनेक भागात मराठा-ओबीसी असा नाहकचा संघर्ष निर्माण झाला. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जातीय व सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ पुढाकार घेणार असल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे यांनी दिली. अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा साडेतिनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सुरू झालेल्या उपक्रमांतून अखिल भारतीय मराठा महासंघ सामाजिक सलोखा जपण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही दहातोंडे पाटील यांनी सांगितले.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना संभाजीराजे दहातोंडे पाटील म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना अठरापगड जातींना सोबत घेऊन ते निर्माण केले. प्रत्येकाच्या कष्टातून स्वराज्य निर्माण झाले. हे राज्य छत्रपतींच्या शिकवणीने चालत आहे. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या जाती-धर्मांत कटूता निर्माण झाल्याचे पहायला मिळते. त्यातून जाती जातीत तेढ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. छत्रपती शिवरायांच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने मार्गक्रमण केले पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी सर्व समाजघटकांना सोबत घेतले पाहिजेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा साडेतिनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याअनुषंगाने देशभरात अखिल भारतीय मराठा महासंघ वर्षभर देशभरातील प्रमुख मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधिस्त प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करणार आहे. वर्षभर हा उपक्रम सुरू राहणार असून, तब्बल एक लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा महासंघाचा इरादा असल्याचेही संभाजीराजे दहातोंडे यांनी सांगितले. यातून सामाजिक सलोखा जोपासण्याचा मराठा महासंघाचा हेतू आहे, असेही दहातोंडे यांनी स्पष्ट केले.
———–