ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळेच हवे : प्रकाश आंबेडकर
– मराठा समाजाला कायमचे आरक्षण द्यायचे असेल, तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे – आंबेडकर
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – “एखादी व्यवस्था सेटल झाली असेल, तर अशा शाश्वत झालेल्या व्यवस्थेत इतर कोणाला घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिकदृष्टीने असलेला सलोखा बिघडत जातो. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळेच असले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचे ताट हे वेगळे असले पाहिजे”, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. आंबेडकर यांनी गुरुवारी जालन्यातील वडीगोद्री येथे जाऊन ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, अजित पवार यांनी सगळ्यांनी ठरवून ओबीसी समाजाचे अस्तित्व संपवायच ठरवले आहे. ओबीसींकडे कुठले लक्ष न देता ओबीसींचे मतदान त्यांना मिळत गेले. आठ दिवस झाले तरी ते ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी टीका आंदोलनकर्ते प्रा. हाके यांनी केली. ओबीसी बांधवांनी आक्रमक होऊ नये, रस्त्यावर येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोन्हीही आंदोलकांची प्रकृती प्रचंड खालावली असून, त्यांना आंबेडकर यांनी आग्रह केल्यानंतर त्यांच्या हाताने पाणी पिले व ओबीसी आरक्षण रक्षणासाठी मरेपर्यंत लढत राहू, आंदोलन थांबवणार नाही, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारला ठणकावून सांगितले.
एकीकडे सगे-सोयर्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने एका महिन्याची मुदत मागून मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवले. मात्र दुसर्या बाजूला सरकारने दिलेले ५७ लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केली. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. मराठवाड्यात ओबीसी समाज आक्रमक झाला असून, रास्तारोको आणि जाळपोळीच्या घटना सुरू आहेत. लक्ष्मण हाकेंनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान, आज प्रकाश आंबेडकर यांनी वडीगोद्री येथे जात, आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की भटक्या विमुक्तांना शाश्वत आरक्षण निघून जाते की काय, याची भीती आहे. याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे. राजकीय पक्षांनी, राजकीय पक्षाचे नेत्यांना आपण भूमिका घ्यायला सांगितले पाहिजे. यामधून मार्ग काढला पाहिजे. आम्ही आमची भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळे असले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे. दोघांना एकमेकांसमोर भिडवत राहणे आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील, अशी माझी धारणा आहे. भाजप संविधान बदलेल, या भीतीने संविधानाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. संविधानावरती ओबीसींनी विश्वास ठेवला. हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो, असे मला वाटते. मनोज जरांगे यांच्याशी बोलत असताना सगेसोयरे शब्द जे ते म्हणत होते, त्याबद्दल मी सल्ला दिला होता. सगेसोयरे शब्दाची व्याख्या तुम्ही करून घेतली पाहिजे किंवा कोणाला तरी करून द्यायला पाहिजे, जोपर्यंत व्याख्या काय होते त्यातले नेमकं काय ते कळत नाही, असेही आंबेडकर याप्रसंगी म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या आग्रहाने पाणी पिले!
व्हि.पी सिंग यांनी पाणी घेतलं नसल्यामुळे त्यांच्या किडनी वरती परिणाम झाला होता. त्यामुळे किमान पाणी घ्यावं उपोषण सुरू ठेवावे, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना केली. त्यानंतर त्यांनी दोन्ही उपोषणार्थीना पाणी दिले.
मला मुस्लीम समाजाची मते मिळाली असती तर लोकसभा निवडणुकीत मी जिंकलो असतो : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी अकोला लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबतही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत माझ्याकडील मुस्लिम शंभर टक्के काँग्रेसकडे गेला आणि तो १०० टक्के काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मी पडलो. मला ओबीसींची आणि मागासवर्गीयांची मते पावणेतीन लाख पडतात, ती मला यावेळेसही मिळाली. मुस्लिम समाजाची मते माझ्याकडे आली असती तर मी जिंकलो असतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान, जालन्याचे जिल्हाधिकारी यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन तब्येतेची विचारपूस केली. दरम्यान, आंदोलनाला ओबीसी समाजाचा प्रतिसाद पाहून लक्ष्मण हाके यांना अश्रु अनावर झाले होते. ओबीसीला चेहरा आहे का? पॉलिटिकल पावर संपली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात ओबीसींना दुय्यम वागणूक मिळत आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र राहिला नाही. लोकांचे तांडेचे तांडे येत आहे. ऊसतोड कामगार, मुकादम यांचे शिष्टमंडळ आले होते, असे सांगत लक्ष्मण हाके भावनिक झाले होते. जरांगेच्या आंदोलनाला राज्य सरकार रेड कार्पेट टाकून लोटांगण घालत येते. मात्र, आठ दिवस झाले आम्हाला शिष्टमंडळसुद्धा भेटायला येत नाही. आम्हाला कोणाच्या ताटातले आरक्षण हिसकवून घ्यायचे नसल्याचे लक्ष्मण हाकेंनी याप्रसंगी सांगितले.
—-
लक्ष्मण हाकेंच्या उशाला बसून विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, उद्याच्या उद्या शिष्टमंडळ पाठवणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन
मराठा आरक्षण देताना आपण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही, असं आश्वासन देत शुक्रवारी दोन मंत्र्यांचे शिष्टमंडळ उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. गेल्या सहा दिवसांपासून लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले असून त्यांच्या भेटीला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गेले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिलं.