मुंबई (विशेष प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत शेतकर्यांच्या नाराजीचा फटका बसल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार भानावर आल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्यांना खूश करण्यासाठी दोन लाखांपर्यंतचे शेतीकर्ज माफ करण्याच्या हालचाली सरकार पातळीवर सुरू असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील शेतकरी सद्या शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज आहेत. दूध, कांद्यासह शेतीपिकांना भाव नाही, पीकविमा कंपन्यांनी शेतकर्यांना विमा रक्कम दिली नाही. तसेच, शेतीपिकांच्या नुकसान भरपाईची रक्कमही शेतकर्यांना मिळाली नाही. खते, कीटकनाशके यांचे बेसुमार वाढलेले भाव, यामुळे लोकसभा निवडणुकीत बसला तसा, विधानसभा निवडणुकीत शेतकरी रोषाचा फटका बसू नये, यासाठी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार हे काळजी घेत आहे. साधारणपणे दोन लाखांपर्यंत शेतीकर्ज माफ केले तर राज्याच्या तिजोरीवर किती बोझा पडेल, याची माहिती राज्य सरकार सहकार खात्याकडून घेत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार दोन लाखाच्या शेती कर्जमाफीची घोषणा करू शकते, अशी माहितीही वरिष्ठ प्रशासकीय सूत्राने दिली आहे.