बिबी (ऋषी दंदाले) – येथील ग्रामीण रूग्णालयातील रक्त, लघवी तपासणी मशीन वर्षभरापासून बंद पडली असून, त्यामुळे गोरगरीब, शेतकरी रूग्णांचे मोठे हाल होत आहेत. खासगी लॅबकडून त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातील या रूग्णालयाला हे मशीन देण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील ३० खेड्यांतील नागरिकांची आहे. हे ग्रामीण रुग्णालय बिबी हे जालना – मेहकर महामार्गावर असून, केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेहमी येण्या-जाण्याचा मार्गावर आहे. तेव्हा, त्यांनी याप्रश्नी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.
बिबी येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी उभारण्यात आलेले आहे. या ग्रामीण रुग्णालयाला १५ ते २० गावांना जोडलेले असून, या गावांसाठी बिबी हे गाव बाजारपेठ असल्यामुळे बिबी येथे नेहमी लोकांची वर्दळ असते. त्यामुळे गोरगरीब जनतेला आरोग्यासाठी बिबी ग्रामीण रुग्णालयातच यावे लागते. या रुग्णालयातील दररोज सरासरी ओ.पी.डी. १०० ते १५० पर्यंत आहे. मात्र येथील रुग्णालयात एक वर्षापासून नादुरुस्त झालेली रक्त, लघवी तपासणी मशीन अजूनपर्यंत आलेली नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेला खाजगी लॅबमधून रक्त, लघवी व इतरही तपासणी करण्याकरिता नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यात गोरगरीब शेतकरी, शेतमजूर लोकांची पिळवणूक होत आहे. या अगोदर अनेकांनी मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, आयुक्त उपसंचालक, जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन उपोषणाचे इशारेही दिलेले आहेत. तरीही जुन्या सरकारला जाग आलेली नाही. मात्र आता जिल्ह्यालाच केंद्रीय आरोग्य मंत्री मिळाले आहे. आता तरी ग्रामीण रुग्णालय बिबी येथे नवीन रक्त, लघवी तपासणी मशीन येईल का, अशी आशा बिबीकरांना तसेच रुग्ण, नातेवाईकांना आहे. अन्यथा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असेही जनतेतून सूर उमटत आहेत.
आम्ही तात्काळ सी. एच. सरांपर्यंत मशीनची माहिती देऊन नवीन मशीनची मागणी केलेली आहे. परंतु अजूनपर्यंत नवीन मशीन आलेली नाही. इंजिनीयरच्या म्हणण्यानुसार, मशीनची लाईफ संपलेली आहे. तरीही रुग्णालयात दररोज ३० ते ३५ गोरगरीब रुग्ण रक्त, लघवी व इतरही तपासणीसाठी येतात. मात्र त्यांना ताबडतोब रिपोर्ट मिळत नसल्यामुळे मनस्ताप सहन करून दुसरे दिवशी रिपोर्टसाठी यावे लागते.