BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

पैशाच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणातील उर्वरित आरोपी अद्याप मोकाटच!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – उधारी पैशाच्या वादातून जानेफळ रोडजवळील तलावाकाठी चार जणांनी मिळून आकाश नंनवरे (रा. माळीपेठ, ता.मेहकर) याला बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान आकाशचा २७ मेरोजी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मृतक आकाशच्या वडिलांनी मेहकर पोलीस ठाण्यात आरोपी गणेश किशोर थाबाडे याच्यासह अन्य दोन ते तीन अनोळखी जणांविरोधात तक्रार दिली होती. यामध्ये गणेश थाबाडे याला पोलिसांनी अटक केली आहे, मात्र इतर उर्वरित आरोपी अजूनही मोकाट असल्याचा आरोप करीत त्यांनादेखील अटक करावी, अशी मागणी मृतक आकाशच्या कुटुंबीयांनी केली आहे. यासाठी त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्जासह निवेदन दिले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन.

आकाशच्या वडिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की योगेश भिकाजी सौभागे हा बालाजी अर्बन पतसंस्थेचा अध्यक्ष असून, तो अवैध सावकारी करतो. माळीपेठ येथील सुनील शिवाजी थिगळे तसेच गणेश किशोर थाबडे यांचे व इतर काही मित्राच्याहस्ते व्याजाने पैसे वाटप करतो. आकाशनेदेखील सुनील थिगळे याच्यामार्फत काही व्याजाने पैसे काढले होते. पैसे वेळेवर न दिल्यामुळे योगेश सौभागे याने सुनील थिगळे व इतर काही जणांमार्फत आकाशला १५ मार्चरोजी डोणगाव रोडवरील त्याच्या कार्यालयात आणले व तिथे आकाशला मारहाण केली. त्यानंतर आकाश पोलिसात तक्रार देईल म्हणून योगेश सौभागे याने त्याच्याविरुद्ध सुनील थिगळे याची मुलगी रस्त्याने घराकडे जात असताना तिचा हात घरून विनयभंग केल्याची खोटी तक्रार दिली.
दि. १६ मार्चला आकाशविरोधात गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण प्रलंबित आहे व यामध्ये मृतक आकाश याला त्यावेळी सत्र न्यायालयाने जमानतदेखील दिली होती. याप्रकरणापासून योगेश सौभागे आणि गणेश थाबडे हे आकाशला जीवाने मारण्याच्या धमक्या देत होते. दरम्यान, २७ मेरोजी रात्री १० ते १०:३० वाजेच्या सुमारास गणेश थाबडे याने योगेश सौभागे व इतर लोकांच्या सांगण्यावरून आकाशला बोलविले, त्यानंतर त्याने इतर लोकांसह आकाशला जानेफळ रोडवरील स्मशानभूमीमागे असलेल्या तलावाच्या काठालगत असलेल्या सैलानीदर्गाहजवळ नेले. त्याठिकाणी गणेश थाबडे याच्यासह उर्वरित उल्लेखीत गैरअर्जदार व त्यांच्या इतर सहकार्‍यांनी आकाशला जीवाने मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. आकाशच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच, ते आपल्या इतर मुलांसह घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी असलेल्या आकाशला मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला अकोला येथे नेण्याचे सांगितले. तातडीने रुग्णवाहिकेद्वारे आकाश याला अकोला येथील दवाखान्यात नेण्यात आले. दरम्यान, गणेश थाबडे आणि योगेश सौभागे याच्यासह इतर काही जणांनी मारहाण केल्याचे आकाशने कुटुंबीयांना सांगितले. असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, अकोला येथील रुग्णालयात भरती करण्यात आल्यानंतर गंभीर अवस्थेतील आकाशचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या वडिलांनी मेहकर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. गणेश किशोर थाबडे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. परंतु या प्रकरणातील इतर आरोपींवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. आकाशच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या इतर आरोपींवरदेखील अटकेची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची पोलिस अधीक्षकांनी तातडीने दखल घेण्याची मागणी पुढे आली आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!