सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील साखरखेर्डा येथील शेंदुर्जन रोडवर असलेल्या छत्रपती हॉटेलवर किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर हाणामारीत दोघे जखमी झाले असून, चार व्यक्तिंविरुध्द साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
साखरखेर्डा येथील शेंदुर्जन रोडवर छत्रपती हॉटेल आहे. त्यामध्ये १८ जूनरोजी सोनू उर्फ साहिल दीपक राजपूत आणि पवन गोपालसिंग डागोर रा. साखरखेर्डा हे दुपारी ४:३० वाजता आले. येथील कामगार शैलेंद्र सुधाकर शेळके यांच्यासोबत वाद घालून सोनू राजपूत याने त्याच्या डोक्यात बीअरची बाटली फोडली तर पवन याने लाकडी काठीने मारले. तेरा मालक सागर कहा है! असे म्हणत वादही घातला. शैलेंद्र शेळके यांच्या तक्रारीवरुन साखरखेर्डा पोलिसांनी सोनू राजपूत आणि पवन डागोर या दोघांवर भारतीय दंडविधानाच्या ३२४, ५०४, ५०६, ३४ कलमांप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर सोनू राजपूत यांनी दिलेल्या तक्रारी नमूद केले आहे की, शैलेंद्र शेळके आणि सागर डुकरे या दोघांनी मागील जुना वाद उकरून काढून शेतात चारा पाणी करण्यासाठी जात असलेल्या साहिल दीपकसिंग राजपूत यास रोहित वाईन बार समोर अडवून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून काचेची बियरची बाटली उजव्या हातावर मारली व जखमी केले. या फिर्यादीवरून शैलेंद्र शेळके व सागर डुकरे यांच्याविरोधात कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप करीत आहेत.